
सामना प्रतिनिधी। राहुरी
वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे एका रेल्वे कर्मचाऱ्याने धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. बबलू ठिठर मंडलकुमार (२५) असे त्याचे नाव आहे. बबलू मूळचा बिहारचा असून तो रेल्वेत गँगमन होता. वांबोरी रेल्वे स्टेशनवर तो काम करायचा. बहिणीचे लग्न असल्याने बबलूला सुट्टी हवी होती. पण वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याला सुट्टी देण्यास नकार दिला होता. यामुळे तो निराश झाला होता. त्यातूनच त्याने आत्महत्या केल्याचे त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले आहे.
दरम्यान, बबलूच्या आत्महत्येचे वृत्त गावात पसरताच परिसरात एकच खळबळ उडाली. वरिष्ठ त्याचा छळ करत होते हे इतर कर्मचाऱ्यांनाही माहित होते. यामुळे कर्मचाऱ्यांनी व बबलूच्या नातेवाईकांनी दिल्लीला जाणारी कर्नाटक एक्सप्रेस अडवत वांबोरी रेल्वे स्टेशनवर रेल रोको आंदोलन छेडले. बबलूचा जाच करणा-या संबंधित अधिका-यांना अटक होत नाही तो पर्यंत मृतदेह उचलणार नाही. असा पवित्रा बबलूच्या कुटुंबीयांनी घेतला. वांबोरी रेल्वे स्टेशनवर कामाला लागल्या पासून वरिष्ठ त्याचा छळ करत होते. असा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे. तसेच बहिणीच्या लग्नासाठी रजा मिळावी ही बबलूची मागणी वरिष्ठ अधिका-यांनी धुडकावून लावली होती. रजा मिळाली नाही तर मी आत्महत्या करेन असा इशारा बबलूने वरिष्ठांना दिला होता. या इशा-याचा व्हिडिओही त्याने वरिष्ठ अधिकारी व रेल्वे मंञ्यांना पाठविला होता. माञ कोणीही त्याची दखल घेतली नाही.
अखेर बुधवार १५ ऑगष्ट या स्वातंत्र्य दिनी सकाळी साडेआठ वाजता वेगात येणाऱ्या मुंबई शिर्डी रेल्वेखाली त्याने आत्महत्या केली. यात बबलूचे शिर धडावेगळे झाले होते.
summary…railway-man-commit-suicide-in-vambori





























































