
सामना ऑनलाईन । मुंबई
स्वच्छ आणि सहज उपलब्ध होणारी ऊर्जा अशी ओळख असलेल्या जलविद्युत ऊर्जेकडे सरकारने साफ दुर्लक्ष केले आहे. राज्यात तब्बल 8355 मेगावॅट क्षमतेचे 12 उदंचन जलविद्युत प्रकल्प प्रस्तावित आहेत. मात्र 2014 पासून हे सर्व प्रकल्प कागदावरच असून चार वर्षांत एकाही प्रकल्पाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होऊ शकलेली नाही. उदंचन जलविद्युत प्रकल्पाबाबत सरकारचे धोरणच ठरलेले नसल्याने हे प्रकल्प कागदावरच राहिले आहेत.
वीज कंपन्यांची 70 टक्के मदार कोळशावरील औष्णिक वीज प्रकल्पांवरच आहे. कोळशावरील वीज प्रकल्पांमुळे मोठय़ा प्रमाणात प्रदूषण होते. त्यामुळे सध्या असलेल्या सुमारे 3600 मेगावॅट जलविद्युत ऊर्जेच्या क्षमतेत वाढ करण्यासाठी 2014 पूर्वी सरकारने तब्बल आठ हजारहून अधिक मेगावॅट क्षमतेचे 12 उदंचन जलविद्युत प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार जलविद्युत विभागाने प्रस्ताव सरकारकडे पाठवले आहेत, मात्र त्यावर कोणतीच कार्यवाही झालेली नाही. नव्याने एकही उदंचन प्रकल्प उभा रहिला नसल्याची खंत जलविद्युत विभागाच्या एका वरिष्ठ अधिकार्याने व्यक्त केली. 12 उदंचन प्रकल्पांपैकी केवळ सरकारने पुणे जिह्यातील वरंधा घाट 800 मेगावॅट आणि वरसगाव 1200 मेगावॅट या दोन प्रकल्पांच्या प्राथमिक अन्वेशन अहवालाला मंजुरी दिली आहे.
काय आहे उदंचन प्रकल्प…
सामान्य जलविद्युत वीज प्रकल्पाप्रमाणेच उदंचन जलविद्युत प्रकल्पातून वीज निर्मिती होते. मात्र या प्रकल्पासाठी उंचीवर एक आणि खालील बाजूला एका धरणाची गरज असते. उंचावरून सोडलेल्या धरणातील पाण्याच्या माध्यमातून दिवसभर वीज निर्मिती केली जाते. वीज निर्मितीसाठी वापरलेले पाणी खालील बाजूला असलेल्या तलावात साठवून रात्रीच्या वेळेस पंपाच्या सहाय्याने हे पाणी उंचावरील तलावात सोडले जाते. सध्या घाटघर येथे याचप्रमाणे 250 मेगावॅट वीजनिर्मिती केली जात आहे.
प्रस्तावित उदंचन क्षमता
प्रकल्प (मेगावॅट)
माळशेज – 700
हुंबर्ली – 400
वरसगाव – 1200
पानशेत -1600
वरंधा घाट – 800
चिखलदरा – 400
आठवण – 1200
कोयना टप्पा 6 – 400
घाटघर 2 -1250
मुतखेल – 110
कोदाळी – 220

























































