
सामना ऑनलाईन । मुंबई
दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे मुंबई व मराठी भाषेशीही ऋणानुबंध होते. मुंबईत आल्यावर ते आवर्जून प्लाझा चित्रपटगृहात आवर्जून जात आणि ठरवून मराठी चित्रपट पाहत. ८० च्या दशकातली ही गोष्ट, तेव्हा नुकतीच भारतीय जनता पक्षाची मुहुर्तमेढ वाजपेयींनी रोवली होती. पण पक्षाचे कार्य करत असताना देखील ते या मराठीसाठी विशेष वेळ द्यायचे. ते कुसुमाग्रजांचे निस्सीम चाहते होते. त्यांच्या कविता ते वाचायचे, त्यांनी चार-पाच कवितांचे अनुवादीही केले आहेत.
पूर्वी मुंबईत आल्यावर ते माजी केंद्रीय मंत्री वेद प्रकाश गोयल यांच्या माटुंगांच्या घरी थांबत. वेद प्रकाश गोयल म्हणजे केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचे वडील. वेद प्रकाश गोयल आणि वाजपेयींचे मैत्रींचे संबंध होते. १९९५ साली राज्यात युतीचे सरकार आले. तेव्हा वाजपेयी रामटेक मध्ये राहत. दिवंगत भाजप नेते प्रमोद महाजन आणि त्यांच्या कुटुंबीयांसोबत वाजपेयी शिवाजी मंदिरात गेले होते आणि मराठी नाटकाचा त्यांनी आनंद घेतला होता. मराठी नाटक, चित्रपट आणि पं. भीमसेन जोशींचा कार्यक्रम ते शक्यतो चुकवत नसत.
२००४ साली लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले होते. या निवडणुकीच्या धामधुमीत वाजपेयींनी एक मराठी चित्रपट पाहण्याची इच्छा होती. ‘श्वास’ हा तो चित्रपट. या चित्रपटाचे विशेष स्क्रीनींग मुंबई ठेवले होते. चित्रपट आवडल्याची प्रतिक्रिया वाजपेयींनी दिली होती.




























































