इम्रान खान यांचा आज शपथविधी, विरोधकांत फूट पडल्याने शाहबाज शरीफ पराभूत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । इस्लामाबाद

तेहरीक ए इन्साफ पक्षाचे नेते आणि माजी क्रिकेट कर्णधार इम्रान खान यांची शुक्रवारी बहुमताने पाकिस्तानचे नवे पंतप्रधान म्हणून निवड झाली आहे. विरोधी आघाडीतील पक्षांत पंतप्रधान निवडीआधीच फूट पडल्याने एकतर्फी झालेल्या आजच्या निवडणुकीत इम्रान यांनी पाकिस्तानी मुस्लिम लीग (नवाझ) पक्षाचे शाहबाज शरीफ यांचा 176 विरुद्ध 96 असा म्हणजे 80 मतांनी दणदणीत पराभव केला. या निवडणुकीत बिलावल भुत्तो यांच्या पाकिस्तान पीपल्स पार्टीने तटस्थ भूमिका घेतल्याने इम्रान यांचा विजय अधिक सोपा झाला. इम्रान खान शनिवारी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत.

65 वर्षीय इम्रान खान यांच्या तेहरीक ए इन्साफ पक्षाला पंतप्रधानपदाची निवडणूक जिंकण्यासाठी 172 मतांची गरज होती. पीपीपीने या निवडणुकीत तटस्थ भूमिका घेतल्याने इम्रान खान यांचा विजय ही केवळ औपचारिकता उरली होती. इम्रानविरोधकांत फूट पडल्याने घडलेही तसेच. आवश्यकतेपेक्षा 4 मते अधिक मिळवत इम्रान खान यांनी सहज विजय मिळवला.