
सामना ऑनलाईन । पाटणा
लोकनायक अटलबिहारी वाजपेयी यांच्यावर टीका करणाऱ्या एका प्राध्यापकाला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. बिहारमधील मोतिहारी इथल्या महात्मा गांधी केंद्रीय विद्यापीठामध्ये ही घटना घडली असून या प्रकरणी १२ जणांना अटक करण्यात आली आहे.
गांधी विद्यापीठात समाजशास्त्र विभागात साहाय्यक प्राध्यापक पदावर काम करणाऱ्या संजय कुमार यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली होती. त्या पोस्टमध्ये त्यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर त्यांच्या घरात घुसून काही जणांनी त्यांना मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या कुमार यांना त्यांच्या शेजाऱ्यांनी त्वरित रुग्णालयात दाखल केलं.
रुग्णालयात पोलिसांनी कुमार यांचा जबाब नोंदवला. या जबाबानुसार, जवळपास २० ते २५ जणांनी कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला करत त्यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. राहुल पांडे आणि अमन बिहारी वाजपेयी या दोन आरोपींची ओळखही कुमार यांनी पटवली आहे. तसंच अटलजींवर टीका करणं हे केवळ निमित्त असून विद्यापीठाचे कुलगुरू आणि अन्य अधिकाऱ्यांविरोधात बोलल्यामुळेच आपल्याला मारहाण झाल्याचं कुमार यांचं म्हणणं आहे. या प्रकरणी ज्या १२ जणांना अटक करण्यात आली आहे, त्यातील एक जण एका हिंदी दैनिकाचा लोकल ब्युरो चीफही आहे. या आरोपींवर मारहाण करणे, जीवघेणा हल्ला करणे आणि तत्सम गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.























































