
सामना ऑनलाईन । डोंबिवली
जारण-मारण, मंत्र-तंत्र, गंडा-तावीज याने अडचणी दूर करतो, प्रेमप्रकरणात यश देतो, दुश्मनाचा काटा काढतो, भरपूर पैसे मिळवून देतो असा अंधश्रद्धेचा बाजार मांडणाऱया भोंदूबाबांची भुते-खेते कल्याण-डोंबिवलीत नाचू लागली आहेत. कल्याणजवळच्या मोहने, आंबिवली गावातील बाबा युनूस अब्बास सय्यद या 80 वर्षांच्या भोंदूबाबाने ताईत देण्याच्या बहाण्याने एका चिमुकलीचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना घडली आहे. खडकपाडा पोलिसांनी या म्हातारडय़ा भोंदूबाबाला अटक करून कोठडीत डांबले आहे.
कल्याण-डोंबिवली परिसरात जागोजागी भोंदूबाबांनी आपले मार्केटिंग करण्यासाठी स्टिकर्स चिकटवले आहेत. ग्रामीण भागातील चाळींमध्ये भाडय़ाने खोल्या घेऊन त्यांचा धंदा जोरात सुरू आहे. अडचणीत सापडलेली जनता त्यांच्या सापळ्यात सहज अडकते आणि या बाबांकडून त्यांची लुटमार केली जाते. गेल्या आठवडय़ात आजार बरा करतो असे सांगून एका भोंदू पुजाऱयाने महिलेचा विनयभंग केल्याची घटना ताजी असतानाच मोहने येथील आंबिवली प्रगती कॉलनीत राहणाऱया 80 वर्षांच्या युनूस अब्बास सय्यद या बाबाने जवळच राहणाऱया दहा वर्षांच्या मुलीला घरात बोलावले. तुला कोणाचाही त्रास होणार नाही, सगळे काही ठीक होईल, तुला ताईत देतो असे सांगत त्याने तिच्यासोबत अश्लील चाळे केले. या घटनेमुळे घाबरलेल्या चिमुकलीने घरी जाऊन ही घटना पालकांना सांगताच त्यांनी पोलिसांत तक्रार नोंदवली.
पॅरोलवर सुटला.. फरार झाला
हत्येच्या गुह्यात अमरावती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगणारा आरोपी बाळाराम म्हस्कर याला 28 दिवसांची पॅरोल रजा मंजूर झाली खरी.. पण बाहेर येताच बाळाराम फरार झाला आहे. मानपाडा पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा आता शोध सुरू केला आहे. कल्याण शीळ रोडवरील काटई गावात राहणाऱया बाळाराम म्हस्कर याला कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने 29 नोव्हेंबर 2017 रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. तेव्हापासून त्याची रवानगी अमरावती कारागृहात करण्यात आली होती. 3 जुलै 2018 रोजी त्याला 28 दिवसांची पॅरोल रजा मंजूर झाली, मात्र त्यानंतर तो कारागृहात हजरच झाला नाही.
































































