संयुक्त राष्ट्रांचे माजी महासचिव कोफी अन्नान यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । स्वित्झर्लंड

संयुक्त राष्ट्रांचे माजी महासचिव आणि शांतीचे नोबेल पारितोषिक विजेते कोफी अन्नान यांचे वयाच्या ८० व्या वर्षी निधन झाले. गरिबांचा मसिहा अशी त्यांची ओळख होती. घाना येथील असलेल्या अन्नान यांनी जागतिक स्तरावर शांतता प्रस्थापित करण्यासाठी मोठे काम केले होते. शांततेसाठी त्यांच्या योगदानाची दखल घेत त्यांना २००१ मध्ये शांततेचे नोबेल देण्यात आले होते.

संयुक्त राष्ट्रांचे महासचिव बनणारे आफ्रिकन वंशाचे ते पहिले नागरिक होते. १९९७ ते २००६ पर्यंत त्यांनी सलग दोन वेळा त्यांनी संयुक्त राष्ट्रांचे महासचिवपद भूषवले होते. महासचिव असताना २०१५ पर्यंत जगातील गरिबी दूर करण्याचे उद्दिष्ट त्यांनी  ठेवले होते. युद्ध काळात शांतता प्रस्थापित करण्याबरोबरच युद्धात होरपळलेल्या लोकांचे पुनर्वसन करण्याचे काम त्यांनी केले होते. सध्या रोहिंग्यांच्या आणि सीरियातील शरणार्थींच्या समस्या सोडविण्यासाठी ते प्रयत्न करत होते. सीरियातील परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी त्यांनी सीरियाचे राष्ट्रपती बशर अल असद यांची नुकतीच भेटही घेतली होती. ते ‘कोफी अन्नान फाऊंडेशन’चे संस्थापक अध्यक्ष होते. शिवाय नेल्सन मंडेला यांनी स्थापन केलेल्या ‘द एल्डर’ या आंतरराष्ट्रीय संघटनेचे अध्यक्षही होते.