कुपवाडात घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला; तीन दहशतवाद्यांचा खात्मा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । श्रीनगर

जम्मू कश्मीरमध्ये कुपवाडा जिल्ह्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळून हिंदुस्थानात घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या तीन दहशतवाद्यांचा सुरक्षा दलाने खात्मा केला आहे. नियंत्रण रेषेजवळील तंगधार सेक्टरजवळ गेल्या पाच दिवसांपासून तणावाचे वातावरण आहे. घुसखोरीच्या प्रयत्नात असणाऱ्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर सुरक्षा दलाने परिसरात शोधमोहीम राबवली आहे. या भागात घुसखोरीच्या प्रयत्नात दहशतवादी लपल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

नियंत्रण रेषेजवळ संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास सुरक्षा दलाच्या जवानांना संशयास्पद हालचाली दिसल्या. त्यानंतर दहशतवाद्यांना शोधण्यासाठी सुरक्षा दलाने शोधमोहीम हाती घेतली. परिसराला घेराव घालत असताना दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर अंदाधुंद गोळीबार केला. त्यानंतर दहशतवाद्यांच्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देत जवानांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला.

कुपवाडातील नियंत्रण रेषेजवळ शुक्रवारी रात्री पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. शनिवारी सकाळपर्यंत पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार करण्यात येत होता. या गोळीबारात दोन स्थानिक नागरिकही जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांना घुसखोरीची संधी मिळावी यासाठी पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. मात्र, जवान सर्तक असून ते दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देत आहेत. कुपवाडातील नौगाम सेक्टरमध्ये 16 ऑगस्टला दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न सुरक्षा दलाने हाणून पाडला होता. या कारवाईत सुरक्षा दलाचे चार जवान जखमी झाले होते.