
विजय जोशी, नांदेड
मराठवाड्यामध्ये गेल्या ६ दिवसांपासून पावसाचा लपाछपीचा खेळ सुरू आहे. मात्र पाऊस येतो तो इतका जोरात येतोय की दाणादाण उडवून जातोय. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, माहूर, हिमायत नगर, किनवट आणि नांदेड शहर तसेच ग्रामीण भागात रात्रीपासून सतत पाऊस पडतोय. या पावसामुळे इथली इंटरनेट सेवा खंडीत झाली आहे.
या पावसाचा सर्वाधिक त्रास हा शेतकऱ्यांना होणार आहे. पेरणीनंतर पाऊस गायब झाला होता. तो ६ दिवसांपूर्वी परतल्याने शेतकरी आनंदीत झाला. मात्र गेले तीन दिवस नांदेड जिल्ह्याच्या बहुतांश भागामध्ये सतत पाऊस पडत असल्याने त्याचा परिणाम खरीप पिकांवर होण्याची भीती वर्तवण्यात येत आहे. अर्धापूर, माहूर तालुक्याचा काही भाग, नांदेडचा काही भाग, हिमायत नगर आणि किनवट तालुक्याचा काही भाग या ठिकाणी काल रात्री ६० मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली आहे. नांदेड शहराच्या सखल भागात पाणी साचल्याने शाळकरी विद्यार्थ्यांचे हाल झाल्याचंही वृत्त आहे.




























































