नांदेडमध्ये अतिवृष्टीचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नांदेड

नांदेड जिल्ह्याला मंगळवार व बुधवारी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. सोमवार सकाळपासून कोसळणाऱ्या पावसाने नांदेडकरांची पुरती दाणादाण उडवली आहे. शहरातील वस्त्यांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने घरांमध्ये पाणी घुसले आहे.

गेल्या दोन दिवसांपासून नांदेडमध्ये पावसाची झड लागली आहे. जिल्ह्यातील चार तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. नांदेड शहरात पावसाने हाहाकार माजवला असून, सखल भागात गुडघ्याएवढे पाणी साचले आहे. महानगरपालिकेच्या बेजबाबदार कारभारामुळे शहरातील बहुसंख्य भागात पाण्याने भरलेले खड्डे, तुंबलेल्या नाल्या दिसत आहेत. कचरा संकलन व्यवस्थेबाबत महानगरपालिकेने वार्डनिहाय घंटागाड्या नेमल्याचे घोषित केले. पण या घंटागाड्या अत्यंत अनियमित आहेत. यामुळे नागरिकांनी घरासमोरील मोकळ्या जागेत कचरा टाकला आहे. गेल्या दोन दिवसांच्या पावसामुळे तो कचरा कुजून दुर्गंधी येत आहे.

अतिवृष्टीचा इशारा मिळताच सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांनी शासकीय अधिकारी आणि पाणी पुरवठा संबंधित अधिकारी यांची बैठक घेतली. दरम्यान, विष्णूपुरी धरण भरले असून पाण्याचा विसर्ग करायचा की नाही असा प्रश्न व्यवस्थापनासमोर आहे.

summary…heavy rain alert at nanded