
सामना प्रतिनिधी । नेवासा
धनगर समाजाला अनुसूचीत जमातीचे आरक्षण मिळावे या मागणीसाठी सकल धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने सोमवारी नेवासे तहसील कार्यालयासमोर ‘ढोल बजाव’ आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सुमारे 300 डफ, ढोल, ताशांचा दणदणाट पाहायला मिळाला. तसेच हातात पिवळे ध्वज, मेंढ्या घेऊन आलेल्या हजारो तरुणांनी “येळकोट.. येळकोट.. जय मल्हार..! च्या घोषणा दिल्या पिवळे ध्वज. यावेळी भंडार्याची उधळण करण्यात आली. यानंतर तहसीलदार उमेश पाटील यांना समाजाच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण सवलती त्वरित लागू कराव्यात या प्रमुख मागणी बरोबरच धनगर समाजाला सोयी-सुविधा उपलब्ध कराव्यात, त्यासाठी स्वतंत्र निधीची व्यवस्था करावी, शेळ्या- मेंढ्या चरण्यासाठी चराऊ कुरणे उपलब्ध करावी, धनगर समाजाच्या मुला-मुलींसाठी तालुकास्तरावर स्वतंत्र वसतिगृह निर्माण करावी, शेळी- मेंढी विकास महामंडळास आर्थिक बजेटमध्ये तरतूद करावी, आरक्षनासाठीच्या आंदोलन प्रसंगी दाखल झालेले गुन्हे विनाअट मागे घ्यावेत या मागण्यांसाठी सोमवारी साडे आकरा वाजता मार्केट कमिटी ते नेवासे तहसील कार्यालय अशा ‘ढोल बजाओ’ आंदोलनास प्रारंभ झाला.याबरोबरच प्रत्येक गावातून मोटारसायकल रॅली काढून या समाजाचे तरुण या आंदोलनात सहभागी झाले आहे. आंदोलना दरम्यान नेवासे शहरात पोलिस उपधिक्षक मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. शरद गोर्डे यांच्या नेतृत्वाखाली सुमारे 142 पोलीसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.





























































