मराठा आरक्षणासाठी हिप्परगा येथील तरुणाची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । औसा

मराठा आरक्षणासाठी आत्महत्यांचे सत्र सुरुच असून औसा तालुक्यातील हिप्परगा (क) येथील तरूणाने करजगाव या आपल्या मामाच्या गावात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली. नितीन पांडुरंग घोगरे (24) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

औसा तालुक्यातील हिप्परगा (क) येथील नितीन घोगरे या तरूणाने करजगाव येथील त्याचे मामा हणमंत मधुकर रावते यांच्या घरातील पत्र्याच्या आडुला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मयत नितीन घोगरे याचे एम.कॉम. पर्यंतचे शिक्षण झाले आहे. गेल्या वर्षी बहिणीच्या लग्नात मोठा खर्च झाला होता. नोकरी लागत नसल्याने कुटुंबाचा खर्च झेपत नसल्याची खिशात चिठ्ठी लिहून ठेवली असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे. मराठा समाजाला आरक्षण नसल्याने नोकरी लागत नाही म्हणून निराश होऊन त्याने गळफास घेतला. या घटनेची नोंद मयताचे आजोबा यांच्या फिर्यादीवरून औसा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली आहे. पुढील तपास औसा पोलीस करीत आहेत.