
सामना प्रतिनिधी। हिंगोली
पवित्र श्रावण मासानिमित्त शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखाली चिंचोली महादेव मंदिर ते ओम कयाधु अमृतधारा महादेव मंदिरापर्यंत २५ कि.मी.च्या पायी कावड यात्रेचे आयोजन कऱण्यात आले होते. यात तब्बल दहा हजाराच्यावर शिवसैनिक व भाविकांनी सहभाग घेतला होता. पावसाची तमा न बाळगता हर हर महादेव, जय भवानी…जय शिवाजी…, शिवसेना जिंदाबाद… यावेळी शेतकरीराजाला सुख-समृध्दी येऊ दे आणि पक्षप्रमुख उध्दवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला यश मिळु दे, असे साकडे जिल्हाप्रमुख बांगर यांच्यासह शिवसैनिकांनी शंभु महादेवाला घातले.
हिंगोली येथील कयाधु नदीच्या तीरावर वसलेल्या ओम कयाधु अमृतधारा महादेव मंदिराच्या माध्यमातुन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर हे मागील ५ वर्षापासुन जिल्ह्यातील विविध महादेव मंदिरापासुन कावडयात्रा काढतात. औंढा येथील श्री नागनाथ ज्योतिर्लिंग, कळमनुरी येथील महादेव मंदिरासह यापुर्वी निघालेल्या कावडयात्रेनंतर सोमवारी हिंगोली तालुक्यातील प्रसिध्द असलेल्या चिंचोलीच्या महादेव मंदिरापासुन कावडयात्रा काढण्याचे निश्चित करण्यात आले होते. पवित्र श्रावण महिन्यात सोमवारी काढण्यात येणारी कावडयात्रा जिल्ह्याचे प्रमुख आकर्षण बनली आहे. सोमवारी सकाळपासुनच हिंगोली शहरासह जिल्ह्यात सर्वत्र पावसाचे आगमन झाले. मात्र, पावसाची तमा न बाळगता तब्बल १० हजाराच्या वर शिवसैनिक, शिवसेनाप्रेमी नागरिक व हिंदू बांधवांनी चिंचोलीकडे जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखाली कुच केली.
चिंचोलीच्या महादेव मंदिरात अभिषेक व महापुजा झाल्यावर कयाधुसह जिल्ह्यातील नद्यांचे पवित्र जल भरुन कावडयात्रेला सुरुवात करण्यात आली. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर, यवतमाळचे जिल्हा सहसंपर्वâप्रमुख व उमरखेडचे माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर, युवासेनेचे जिल्हा युवा अधिकारी दिलीप घुगे, बाजीराव सवंडकर, उपजिल्हाप्रमुख परमेश्वर मांडगे, यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधी या कावडयात्रेत सहभागी झाले होते.
हर हर महादेव…, जय भवानी… जय शिवाजी…, शिवसेना जिंदाबाद…., बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो…., उध्दव ठाकरे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है…. अशा घोषणा शिवसैनिकांनी दिल्या. ढोल-ताशांचा गजर आणि भगवे झेंडे डौलाने फडकवत ही कावडयात्रा चिंचोलीहुन बासंबा, येळी, पारडा या गावांमध्ये पोहचल्यावर ग्रामस्थांनी स्वागत केले. हिंगोली ते अकोला या मार्गावर वाहतुकीला कुठलाही अडथळा होणार नाही, याची खबरदारी शिवसैनिकांनी घेतली. भर पावसातही मोठ्या जल्लोषात व उत्साहात शिवसैनिक कावड घेऊन पायी चालत होते. शहरामध्ये कावड यात्रेचे आगमन झाल्यावर नगराध्यक्ष बाबाराव बांगर, नगरसेवक गणेश बांगर, उमेश गुठ्ठे, शिवसेना शहरप्रमुख अशोक नाईक, विधानसभा संघटक डॉ. रमेश शिंदे, उध्दवराव गायकवाड, जि.प.चे माजी अध्यक्ष राजेश पाटील गोरेगावकर यांनी जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांचे व कावडयात्रेचे स्वागत केले. शहरातील मुस्लीम बांधवांनी देखील जिल्हाप्रमुख बांगर यांना पुष्पहार घालुन कावडयात्रेतील भाविकांना केळीचे वाटप केले.
शहरातील पोस्ट ऑफीस रोड, जवाहर रोड, गांधी चौक, इंदिरा चौक, बसस्थानक, नांदेड नाका, अग्रसेन चौक, औंढा रोड मार्गाने ओम कयाधु अमृतधारा महादेव मंदिरात या यात्रेचा समारोप करण्यात आला. या समारोपाच्या वेळी महाभिषेक आणि महाआरती करण्यात आली. तसेच भजनाचा कार्यक्रमही घेण्यात आला. कावडयात्रेमध्ये शंभु महादेवाच्या आणि शिवसेनेच्या जयजयकाराचे गीतही वाजवण्यात आले. हिंगोली जिल्ह्यासह महाराष्ट्रातील शेतकरीराजाला सुखाचे दिवस येऊ देत आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव साहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेला यश मिळु दे, वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची स्वप्नपुर्ती होऊ दे, असे साकडे महादेवाच्या चरणी घातल्याचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर व माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर यांनी सांगितले.





























































