कॅन्सरशी झुंज देणारा इरफान परत येतोय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

सध्या लंडनमध्ये कर्करोगावर उपचार घेत असलेल्या अभिनेता इरफान खान याने चाहत्यांसाठी खूशखबर दिली आहे. इरफान ‘हिंदी मीडियम’ या चित्रपटाच्या सिक्वेलमधून पुनरागमन करणार आहे. ‘हिंदी मीडियम 2’ च्या निर्मात्यांनी लंडनमध्ये जाऊन इरफानची भेट घेतली. चित्रपटाची स्क्रिप्ट ऐकल्यावर इरफानने होकार दिल्याची माहिती एका बॉलीवूड वेबसाइटने दिली आहे.

2017 साली ‘हिंदी मीडियम’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यामध्ये इरफानसोबत सबा करीम हिने काम केले. साकेत चौधरी दिग्दर्शित या चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा फेब्रुवारी महिन्यात करण्यात आली होती. ‘हिंदी मीडियम 2’च्या दिग्दर्शनाची धुरा होमी अडजानिया सांभाळणार आहेत.

इरफानला न्यूरएंडोक्राइन टय़ुमर झाल्याचे निदान झाले असून त्याच्यावर लंडनमध्ये उपचार सुरू आहेत. उपचारापूर्वी त्याने दोन प्रोजेक्टमधून माघार घेतली होती. विशाल भारद्वाज दिग्दर्शित दीपिका पदुकोणसोबतचा सिनेमा तसेच गॉरमिंट ही वेबसीरिजही त्याने सोडली. अलीकडेच त्याची मुख्य भूमिका असलेला ‘कारवां’ चित्रपट प्रदर्शित झाला.