मित्रांना अद्दल घडविण्यासाठी त्याने रचला आत्महत्येचा बनाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । बुलढाणा

मित्रांना अद्दल घडविण्यासाठी अजय हिवाळे या इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांने आत्महत्येचा बनाव रचून पोलीस यंत्रणेला शोध कार्याला लावले असल्याचा प्रकार बुलढाण्यात उघडकीस आला आहे. पोलिसांनी हिवाळे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

शहरातील टी.बी. हॉस्पिटल समोरील सरकारी तलावात एका युवकाने आत्महत्या केल्याची वार्ता सकाळी पसरली होती. सकाळच्या सुमारास फिरणाऱ्या काही नागरिकांना तलावाच्या काठावर एक बॅग व सुसाईड नोट आढळून आली. याबाबत त्यांनी पोलिसांना कळविले असता पोलिसांनी लगेच घटनास्थळ गाठले. या चिठ्ठीमध्ये ‘ऋषी व्यवहारे व निलेश उर्फ लड्ड्या निर्मल यांच्या त्रासामुळे मी आत्महत्या करीत आहे’ असा मजकूर लिहिलेला होता. त्यामुळे पोलिसांनी बचावपथकाला घटनास्थळी पाचारण केले. तलावातील मृतदेह शोधण्यासाठी प्रशासकीय यंत्रणाने शर्तीचे प्रयत्न सुरु केले. गोताखोरांसह, जाळीची व बोटीची व्यवस्थाही करण्यात आली. सकाळी ७ पासून ही शोधाशोध सुरुच होती. मात्र आत्महत्या करणार्‍याचा मृतदेह काही आढळून आला नाही.

मृतदेह कसा आढळून येईल? कारण महाभाग अजय हिवाळे याने मित्रांच्या नावाने सुसाईड नोट लिहून चक्क पोलिसांची दिशाभूल करीत आत्महत्येचा बनाव केला होता. सकाळी ७ वाजल्यापासून प्रशासकीय यंत्रणेची चांगलीच दमछाक होत असताना ११ वाजताच्या दरम्यान या महाभागाचा एका मित्राला फोन आला. त्याने ही माहीती पोलिसांना दिल्यानंतर अजय कल्याणला असल्याचे कळले. बुलढाणा ठाणेदार यु. के. जाधव यांनी कल्याण रेल्वे स्टेशनला माहिती दिल्यावरुन कल्याण पोलिसांनी अजयला ताब्यात घेतले व मुंबई येथील त्याच्या नातेवाईकाकडे त्याला सुपूर्त केले.

या संपूर्ण घटनेची माहीती अजयच्या मोठ्या भावाला असतानाही त्याने पोलिसांपासून लपवून ठेवली. अजय हा चिखली येथील अनुराधा इंजिनिअरिंग कॉलेजच्या पहिल्या वर्षाला शिकत आहे. तसेच अजय हिवाळे याने पोलिसांची दिशाभूल केल्यामुळे त्याच्याविरुद्ध भादंवि कलम १८२ प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. आत्महत्येचा या बनावामुळे पोलिसांची मात्र चांगलीच दमछाक झाली होती.