
>> प्रसाद शिरगावकर, [email protected]
मागच्या आठवडय़ात पुण्यातल्या कॉसमॉस बँकेवर तब्बल 94 कोटी रुपयांचा ‘सायबर दरोडा’ घातला गेला. प्रत्यक्ष खातेदारांच्या खात्यांमधून पैसे गेले नसले तरी बँकेचे एटीएमचे आणि ऑनलाइन व्यवहार दोन दिवस बंद ठेवल्याने खातेदारांची गैरसोय झाली. शिवाय यासंबंधी अनेक अफवा पसरल्याने बँकेच्या खातेदारांच्या आणि इतर नागरिकांच्याही मनात ऑनलाइन बँकिंग आणि डिजिटल विश्वाविषयी असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे. या पार्श्वभूमीवर हा ‘दरोडा’ कसा पडला असावा आणि सुरक्षिततेसाठी काय उपाययोजना कराव्यात याचा ऊहापोह करणारा लेख.
कॉसमॉसवरचा सायबर दरोडा समजून घेण्याआधी मुळात एटीएममधून पैसे काढण्याची व्यवस्था कशी चालते ते आपण बघुया.
आपल्या खिशात जर व्हिसा किंवा मास्टरकार्डचं डेबिटकार्ड असेल तर आपण जगाच्या पाठीवरच्या जवळपास कोणत्याही एटीएममधून पैसे काढू शकतो. आपण ‘अमुक रक्कम दे’ असा आदेश एटीएमला दिला, की एटीएम ‘हे कार्ड खरं आहे का आणि याला अमुक रक्कम द्यायची का?’ हे प्रश्न कार्ड नेटवर्कला (म्हणजे व्हिसा किंवा मास्टरकार्डच्या नेटवर्कला) विचारतं. कार्ड नेटवर्क ते कार्ड योग्य आहे का तपासतं आणि योग्य असेल तर ‘अमुक रक्कम द्यायची का?’ हा प्रश्न बँकेकडे पाठवतं. बँकेने प्रत्येक नेटवर्ककरिता एक स्विच (सर्व्हरचा एक प्रकार) ठेवलेला असतो. नेटवर्ककडून हा प्रश्न आधी बँकेच्या ‘स्विच’कडे येतो. बँकेचा स्विच हा प्रश्न बँकेच्या कोअर बँकिंग प्रणालीकडे पाठवतो. कोअर बँकिंग प्रणालीतून जे उत्तर येतं ते स्विच थेट एटीएमला कळवतं. जगाच्या कोणत्याही एका कोपऱयावर एटीएम आणि दुसऱया टोकावर बँक असली तरी हे सारं क्षणार्धात घडतं आणि आपल्याला एटीएममधून पैसे काढता येतात.
या क्षणार्धात घडणाऱया व्यवहारामध्ये आपल्या हातातलं कार्ड (त्याचा पिन) आणि एटीएम यंत्र ही प्रत्यक्षातली उपकरणं आणि एटीएम ते कार्ड नेटवर्क, कार्ड नेटवर्क ते बँकेचा स्विच, बँकेचा स्विच ते कोअर बँकिंग सिस्टम यांच्यातली इलेक्ट्रॉनिक संदेशप्रणाली यांचा समावेश असतो.
या संपूर्ण साखळीतले कच्चे दुवे शोधत राहण्याचे काम सायबर दरोडेखोर सतत करत असतात आणि कुठेही कच्चा दुवा सापडला की त्याचा फायदा घेऊन भुरटय़ा चोऱयांपासून ते मोठय़ा दरोडय़ापर्यंत कोणत्याही प्रकारची लूट ते करू शकतात.
कॉसमॉस बँकेवरचा दरोडा हा बँकेच्या स्विचमधला कमजोर दुवा शोधून केलेला हल्ला होता असा प्राथमिक अंदाज आहे. दरोडेखोरांनी कॉसमॉस बँकेच्या नेटवर्कमध्ये एक ‘मालवेअर’ (म्हणजे स्वतःचं ‘कुटिल कारस्थानं करणारं’ सॉफ्टवेअर) पाठवलं. ते मालवेअर तोतया स्विच बनून खऱया स्विचच्या समोरच्या बाजूला बसून राहिलं. याच सुमारास दरोडेखोरांनी आणि त्यांच्या 28 देशांमधल्या हस्तकांनी साधारण साडेचारशे डमी कार्डं तयार केली. आपला तोतया स्विच सुरू झाला हे समजताक्षणी 28 देशांमधल्या वेगवेगळ्या एटीएममधून त्यांनी पैसे काढायला सुरुवात केली. एटीएमनी अर्थातच ‘पैसे द्यावे का?’ असा प्रश्न व्हिसा नेटवर्कला विचारला असेल. मात्र व्हिसा नेटवर्ककडून आलेले ‘पैसे द्यावेत का?’ हे प्रश्न कोअर बँकिंगकडे न पाठवता या तोतया स्विचनं ‘देऊन टाका पैसे’ अशी उत्तरं परस्पर देऊन टाकली.
वरकरणी पाहता ही साधी, नवशिक्यांनी केलेली चोरी दिसत नाही, तर अत्यंत हायटेक आणि अट्टल दरोडेखोरांनी संघटितपणे घातलेला दरोडा दिसत आहे. बँकेच्या स्विचसारखं अत्यंत क्लिष्ट सॉफ्टवेअर तयार करणं, ते कोणत्याशा मालवेअरद्वारे बँकेच्या नेटवर्कमध्ये घुसवणं, डमी कार्ड तयार करून त्याद्वारे बिनबोभाटपणे व्यवहार करणं या साऱयासाठी अत्यंत हायटेक स्किल्स असावी लागतात. शिवाय 28 देशांमध्ये हस्तक असणं, त्या साऱयांकडे बनावट कार्ड तयार करण्याची यंत्रणा असणं आणि हल्ल्याच्या दोन-चार तासांमध्ये अत्यंत सुसूत्रपणे 450 बनावट कार्ड तयार करून जगभरच्या एटीएममधून सुमारे 15 हजार व्यवहार करून पैसे काढणं हे सारं अत्यंत संघटित अशा टोळीलाच जमू शकतं. एटीएममधून असे कोटय़वधी रुपये कसे काढता येतील असा प्रश्न पडला म्हणून हा हिशेब करून बघितलाः 28 देशांमध्ये 450 कार्ड म्हणजे प्रत्येक देशात साधारण 16 बनावट कार्ड आणि 450 कार्डांद्वारे 15 हजार व्यवहार म्हणजे एका कार्डावर साधारण 33 व्यवहार. चार-सहा तासांत प्रत्येक कार्डावरून 33 व्यवहार करू शकणं अशक्य नाही.
कॉसमॉस बँकेवर पडलेल्या सायबर दरोडय़ाला तांत्रिक भाषेत `ATM Cash-out’ दरोडा म्हणतात. कॉसमॉसवरचा दरोडा हा जगातला आजवरचा सगळ्यांत मोठा `ATM Cash-out’ दरोडा मानला जात आहे. याआधी 2016 मध्ये थायलंडच्या एका सरकारी बँकेवर अशा प्रकारचा दरोडा घालून साधारण दोन कोटी रुपयांचा डल्ला मारला गेला होता, तर अमेरिकेतल्या व्हर्जिनिया राज्यातल्या एका छोटय़ा बँकेवर दोन हल्ले करून सुमारे 16 कोटी रुपयांचा डल्ला मारला गेला होता. कॉसमॉसवरच्या दरोडय़ाच्या काही तास आधी अमेरिकेच्या FBI संघटननेने अशा प्रकारचा मोठा हल्ला करण्याच्या तयारीमध्ये काही दरोडेखोर असल्याची धोक्याची सूचना प्रसारित केली होती. दुर्दैवाने त्या ऍलर्टचा हा दरोडा टाळण्यासाठी उपयोग होऊ शकला नाही असे दिसत आहे.
एक प्रश्न असा पडू शकतो की जगातल्या 28 पैकी कोणत्यातरी एका देशात बसलेल्या हॅकर्सनी दरोडय़ासाठी पुण्यातली तुलनात्मकदृष्टय़ा छोटी अशी कॉसमॉस बँक का निवडली असावी? तर शक्यता अशी आहे की, कॉसमॉस बँक ही ठरवून टार्गेट केली नसावी. जगातल्या सर्वच बँकांच्या व्यवस्थांमध्ये घुसण्याचा, त्यांच्या यंत्रणा हॅक करण्याचा, व्यवस्थांमध्ये मालवेअर पाठवण्याचा प्रयत्न अनेक हॅकर्स सतत करत असतात. अहोरात्र रँडमली सुरू असलेल्या या प्रयत्नांमध्ये जिथे कुठे शिरकाव करता येतो तिथे दरोडा टाकला जाऊ शकतो. कॉसमॉसवरचा दरोडा हा विशिष्ट बँक ठरवून घातलेल्या दरोडय़ाऐवजी तिथे शिरकाव करता आला म्हणून घातलेला दरोडा वाटत आहे.
सायबर दरोडेखोर अफाट टेक्नोसॅव्ही असतात. जिथे दरोडा घातला तिथल्या आपल्या पाऊलखुणा पुसून टाकण्याचे कसब त्यांच्यापाशी असते. या दरोडेखोरांचा शोध घेणे ही जवळपास अशक्य गोष्ट असते. असा दरोडा पडल्यानंतर बँकेला मोठा आर्थिक फटका बसतोच शिवाय ग्राहकांचा विश्वास डळमळीत होऊन बँकेच्या नेहमीच्या व्यवसायावरही मोठा नकारात्मक परिणाम होऊ शकतो. त्यामुळे असा दरोडा पडणार नाही यासाठी सर्वच बँकांनी अत्यंत सजग राहून अफाट काळजी घेणे गरजेचे आहे.
अर्थात या सर्व उपाययोजना बँका करत आहेत, करत असतातच. कॉसमॉसच्या दुर्दैवी उदाहरणानंतर या अधिक सजगपणे, अधिक काटेकोरपणे करायला हव्यात असे दिसत आहे. आपल्या व्यवस्थेतली एकादी त्रुटी, एखादी चूक, एखादा कच्चा दुवा सायबर दरोडेखोरांना हल्ल्याचे आमंत्रण देणारा ठरू शकतो आणि आपल्याला कोटय़वधींचा फटका बसू शकतो.
इंटरनेट आणि माहिती-तंत्रज्ञानामुळे आज जगभरातले आर्थिक विश्व पूर्णपणे जोडलं गेलंय. दर क्षणाला अब्जावधींचे व्यवहार पार पाडणं शक्य झालं आहे. त्याचवेळी याच तंत्रज्ञानाचा वापर करून बँकांना किंवा ग्राहकांना लक्ष्य बनवणारे दरोडेखोर अन त्यांच्या टोळय़ाही तयार होत आहेत, झाल्या आहेत. नव्या युगातल्या या नव्या सायबर दरोडेखोरीच्या आव्हानावर मात करण्यासाठी बँकांनी तंत्रज्ञानात चार पावलं पुढे असणं गरजेचं आहे. कॉसमॉसवरच्या दरोडय़ानंतर सर्वच बँका तंत्रज्ञान आणि सुरक्षेमध्ये पुरेशी गुंतवणूक करून दरोडेखोरांच्या चार पावले पुढे राहण्याचा प्रयत्न करतील अशी आशा करूया.
– सायबर दरोडय़ांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी बँकांनी स्वतःच्या संगणकीय व्यवस्था, स्विचेस, नेटवर्क्स आणि सर्व्हर्स या साऱयांसाठी कमालीची सुरक्षा व्यवस्था अमलात आणणं आणि ती सतत अद्ययावत ठेवणे गरजेचे आहे. बँकेच्या सुरक्षा व्यवस्थेचे तीन प्रमुख भाग असतात.
1) भौतिक सुरक्षा (physical security): यामध्ये आपले सर्व संगणक, सर्व्हर्स इत्यादी उपकरणं सुरक्षित असणे आणि कोणत्याही अयोग्य व्यक्तीला किंवा उपकरणाला (उदा. USB drive) या उपकरणांपर्यंत पोचू न देणे हे करावे लागते.
2) सुरक्षा प्रणाली (software security)- यामध्ये संगणकांवरच्या anti virus softwares पासून ते वेगवेगळय़ा प्रकारच्या firewalls आणि सर्व्हर्सवरची security software असणे, ती अद्ययावत असणे आणि त्यांचे सतत मॉनिटरिंग करणारी टीम असणे हे करावे लागते.
3) प्रक्रिया व व्यवहारांतली सुरक्षा (security processe) : यामध्ये आपल्या सर्व कर्मचाऱयांना सायबर सुरक्षेसंबंधी सतत प्रशिक्षण देत राहण्यापासून ते आपल्या सुरक्षा व्यवस्थांचे नियमितपणे ऑडिट करत राहणे हे करावे लागते.
(लेखक मुक्तस्रोत तंत्रज्ञानामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणारे प्रशिक्षक आणि वक्ते आहेत़)

























































