श्रीकृष्ण सरस्वती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

– विवेक दिगंबर वैद्य

कोल्हापूर येथील प्रख्यात दत्तावतारी सत्पुरुष श्रीकृष्ण सरस्वती (कुंभारगल्लीचे स्वामी) यांच्या विषयीचा हा लेख.

करवीरनगरी ‘कोल्हापूर’ येथील शिरोळ तालुक्यामध्ये नांदणी नावाच्या छोटय़ाशा खेडेगावात आप्पा भटजी जोशी आणि अन्नपूर्णाबाई सुखासमाधानाने राहत होते. नांदणी येथे भिक्षुकीचे परंपरागत काम करणारे आप्पा भटजी हे भारद्वाज गोत्राचे देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण, प्रखर दत्तोपासक होते.

अन्नपूर्णाबाईदेखील सत्त्वशील व धर्मपरायण होत्या. उभयता पतीपत्नी नित्यनेमाने जवळच्याच ‘नरसोबाची वाडी’ या दत्तक्षेत्री दर शनिवारी आणि प्रत्येक पौर्णिमेस जात असत. घरामध्ये सुखसमाधान नांदत असले तरी पोटी संतान नसल्याने पतीपत्नी मनाने कायम उदास असत. नृसिंहवाडीसारख्या जागृत स्थानी नित्यनेमाने जात असताना श्रीदत्तमहाराजांच्या चरणी आपल्या मनातील सल आणि रुखरुख व्यक्त करावयास हवी असे अन्नपूर्णाबाईंचे मत होते, मात्र तसे करण्यास आप्पा भटजींना संकोच वाटत असे.

अशा घालमेलीत बराच काळ निमाला. मात्र पुढे आप्पा भटजींनीच ही कोंडी फोडली आणि एके दिवशी स्वतःहूनच श्रीगुरुचरणी आपली कैफियत मांडली. त्याच रात्री तिथे मुक्कामास राहिलेल्या आप्पा भटजींना रात्री यतिवेषधारी श्रीगुरूंचा स्वप्नदृष्टांत झाला आणि श्रीदत्तगुरूंनी आप्पा भटजींना ‘‘उगीच चिंता करू नये, मीच तुझ्या घरी अंशरूपाने जन्म घेईन’’ अशी निखालस ग्वाही दिली. पुढे यथासमयी श्रीगुरूंचा स्वप्नदृष्टांत फलदायी ठरला. अन्नपूर्णाबाईंना मातृत्वाची चाहूल लागली.

आप्पा भटजींचे घर आनंदाने न्हाऊन गेले असले तरी अन्नपूर्णाबाईंना मात्र काही विचित्र पद्धतीचे डोहाळे लागले. त्यांचे खाण्यापिण्याचे भान पुरते निमाले होते. त्यांना सतत मारुती मंदिरामध्ये बसून राहावेसे वाटे. त्यांच्या मनात सतत उंच सिंहासनावर बसण्याची किंवा पालखीतून फिरण्याची इच्छा येत असे. त्यांचे हे वागणे पाहून आप्तेष्ट चिंतातुर झाले असले तरी आप्पा भटजी निवांत होते. ते स्वतः उत्तम ज्योतिषी असल्याने ही सर्व लक्षणे श्रीदत्तमहाराजांचा अंशावतार जन्माला येण्याचे सूतोवाच करणारी आहेत हे त्यांना समजून चुकले होते.

माघ वद्य पंचमी, शके 1757 अर्थात 7 फेब्रुवारी 1836 रोजी अन्नपूर्णाबाईंच्या पोटी दत्तावतार जन्म घेता झाला. आप्पा भटजी स्वतः निष्णात ज्योतिषी असल्याने त्यांनी नवजात बालकाचे तेज पाहून आणि त्याची जन्म-लग्नकुंडली मांडून भविष्य वर्तविले, ‘‘या अलौकिक बालकाच्या पत्रिकेत ‘ब्रह्मनिष्ठ व जीवनमुक्त’ योग आहेत. हे बालक सर्वसामान्यांमध्ये मूढपणाने वागेल. निजानंदी निमग्न राहील. हे बालक कुणाच्याही निंदा वा स्तुतीला भाळणार नाही. या बालकामध्ये अवधूत योग्याची, सिद्ध सत्पुरुषाची सर्व लक्षणे आहेत. हा ब्रह्मचारी राहील. सर्वत्र संचार करून लोकोद्धाराचे कार्य करील. तसेच अनेकांना भगवद्भजनी दृढ करून त्यांना मोक्षाचा मार्ग दाखवील.’’

नवजात बालकाचे बारसे मोठय़ा थाटामाटात करण्यात आले आणि त्याचे नाव ‘श्रीकृष्ण’ ठेवण्यात आले. हे अद्भुत बालक जन्माला आल्यापासून रडलेच नाही, इतकेच नव्हे तर त्याने मातेच्या दुधास स्पर्शदेखील केला नाही. तो नित्य आनंदी दिसत असे. अन्नपूर्णाबाईंसाठी बाळाचे हे वागणे विलक्षण कष्टदायी होते. बऱ्याच वर्षांनी जन्मलेले हे लेकरू दुग्धपान करीत नाही या कारणाने मातेचा पान्हा वाया जात होता. बालकाच्या लीला मन तृप्त करीत असल्या तरीही माऊली काही अंशी पुत्रसौख्याला वंचितच राहिली. अशातच काही महिने गेले.

पुढे बालकाच्या उष्टावण्याचा कार्यक्रम नजीक येऊन ठेपला. अन्नपूर्णाबाईंनी श्रीकृष्णबाळाला वाडी तसेच मंगसुळी येथील कुलदैवत श्रीखंडेरायाचरणी नेण्याचे ठरविले. आप्पा भटजींसह निघालेली ही मंडळी श्रीदत्तदर्शन घेऊन मंगसुळी येथे आली. त्यांनी येथे कृष्णबाळाच्या उष्टावणाचा कार्यक्रम केला. मात्र बाळ मुखी अन्न घेईना. बळेच भरवू पाहता तो अन्न बाहेर थुंकून टाकता झाला. त्यावर निरुपाय झालेले मातापिता निराश मनाने माघारी परतले. आता श्रीदत्तगुरूच या बालकाचे पालनपोषण करतील असे मनाशी योजून ते निवांत राहिले.

बालक दिसामासाने वाढत होते, आनंदाने हसत-खेळत होते. मात्र बोलणे आणि खाणे या दोन्ही क्रिया करण्यास ते अनुत्सुक असे. अनेकांना कृष्णबाळ मुका असावा अशी शंका येत असे. पुढे पाचेक वर्षांनी श्रीकृष्ण तोडकेमोडके बोलू लागला. मात्र त्याचे बोलणे अगम्य आणि विसंगत होते. सदान्कदा भल्यामोठय़ा दगडावर बसून तो आपण राजा असल्याचे भासवीत असे आणि ‘‘सर्वांच्या समस्या व त्रास मी दूर करता’’ असे सांगून तो आपल्या सवंगडय़ांवर अंमल गाजवीत असे. आपल्याच मस्तीत राहणारा श्रीकृष्ण कधी कधी मित्रांना सांगत असे की, ‘‘अरे, तुम्ही माझ्या पाया पडा. मी तुम्हांला तुमच्या सर्व पापांतून मुक्त करीन. माझा अंगारा घ्या म्हणजे तुम्ही दोषमुक्त व्हाल.’’

काही दिवसांनी श्रीकृष्ण मंगसुळी येथे कुलदैवत श्रीखंडेरायाच्या दर्शनास जाण्यासाठी हट्ट करता झाला. अन्नपूर्णामाता तयार होईना. मात्र आप्पा भटजी यांनी पुढाकार घेत पत्नीस समजावले आणि श्रीकृष्णास शिदोरी देऊन मंगसुळीस धाडले. श्रीकृष्ण मोठय़ा आनंदाने निघाला. बेडग येथे त्याने एका विहिरीवर यथेच्छ जलक्रीडा केली. नेमकी त्याचवेळी एक स्त्री तिथे पाणी भरण्याकरिता आली असता तिचे लक्ष आनंदात दंग झालेल्या या गोऱयापान बटू मूर्तीकडे गेले. तिला तिथे पाहून श्रीकृष्ण लागलीच विहिरीबाहेर आला आणि तिचा हात धरून तिच्याकडे दहीभात मागू लागला. या साजिऱ्यागोजिऱ्या तेजस्वी बालकाचा ओळखपाळख न जाणता केलेला हा आगळावेगळा हट्ट त्या मूळच्या निपुत्रिक असलेल्या माऊलीला कमालीचा सुखावून गेला. तिने श्रीकृष्णास आपल्या घरी आणले.

बालपणापासून आईच्या हातचे काहीही न खाणारा कृष्णबाळ त्या स्त्रीने समोर ठेवलेला दहीभात मनापासून खाता झाला. त्याच्या त्या निरागस बाळलीला पाहून ती स्त्री हरखली आणि त्यास आपलाच मुलगा जाणून स्वहस्ते भरवू लागली. श्रीकृष्णाने तिच्या हातून दहीभात खाण्याचा हट्ट पूर्ण केला आणि लागलीच तिथून प्रयाण केले. त्या स्त्रीने जेव्हा त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला तेव्हा श्रीकृष्णाने तिला ‘‘पुत्रवती भव’’ आशीर्वाद दिला (हा आशीर्वाद काही काळाने प्रत्यक्षातही साकारला) आणि तिथून त्वरेने तो मंगसुळीस निघून आला.

मंगसुळीस येताक्षणीच श्रीकृष्णाने श्रीखंडेरायाच्या प्रत्यक्ष दर्शनाचा ध्यास घेतला. त्याने एका लिंबाच्या झाडाखाली ठाण मांडले आणि जोवर श्रीखंडोबा स्वतः प्रकट होत नाहीत तोवर तिथून कुठेही न जाण्याचे ठरविले. अशातच बराच काळ लोटला. अखेर साक्षात श्रीशंकर नंदीवर बसून पार्वतीसह तिथे अवतरले आणि प्रसन्न चित्ताने श्रीकृष्णास सांगते झाले, ‘‘अरे, तू माझाच अंश आहेस. आता तू नीघ. माघारी जा आणि काही दिवसांनी अक्कलकोटी जाऊन श्रीनृसिंहभान (स्वामी समर्थ) यांची भेट घे. तेच तुझे गुरू आहेत.’’

[email protected]
विवेक दिगंबर वैद्य