लष्करासाठी ४६ हजार कोटींच्या निधीला मंजूरी; नौदलासाठी १११ हेलिकॉप्टर खरेदी करणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

लष्कराच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने ४६ हजार कोटींच्या निधीला मंजूरी दिली आहे. नौदलासाठी १११ अत्याधुनिक हेलिकॉप्टर खरेदी करण्यासाठी त्यातील २१ हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या डिफेन्स काउंसिलच्या बैठकीत या निधीला मंजुरी देण्यात आली.

नौदलासाठी खरेदी करण्यात येणाऱ्या १११ अत्याधुनिक हेलिकॉप्टरमध्ये दोन इंजिन असतील. दोन इंजिनवाले हे हेलिकॉप्टर एक इंजिन असलेल्या चेतक हेलिकॉप्टरची जागा घेणार आहेत. हे अत्याधुनिक हेलिकॉप्टर युद्धनौकेच्या डेकवरूनही उड्डाण करण्यास सक्षम आहेत. तसेच ३ हजार ३६४ कोटी रुपये स्वदेशी बनावटीच्या १५० अत्याधुनिक तोफांच्या खरेदीसाठी खर्च करण्यात येणार आहेत.तर २२ हजार कोटी रुपये इतर शस्त्रास्त्रे आणि साधनसामग्रीसाठी खर्च करण्यात येणार आहेत.

‘स्टॅटेजिक पार्टनरशिप’ (एसपी) मॉडेलनुसार नौदलासाठी हेलिकॉप्टर खरेदी करण्यात येणार आहेत. शस्त्रास्त्र उत्पादनात स्वदेशी कंपन्यांचा सहभाग वाढवण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने जुलै महिन्यात या मॉडेलसाठी मार्गदर्शक तत्वे जारी केली होती. या मॉडेलनुसार देशातील कंपन्या शस्त्रास्त्रे बनवणाऱ्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांसोबत काम करणार आहेत.