उद्धव ठाकरेंनी काढले ‘डिजिटल इंडिया’चे वाभाडे, जिओ फुकट देताय, मग पेट्रोल-डिझेल, रेशनही फुकट द्या!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

‘डिजिटल इंडिया’त सगळं डिजिटल झालं तरी लोकांची पोटं भरू शकत नाहीत. व्हॉटस्ऍप-फेसबुकवर भाकरी ट्रान्स्फर होऊ शकत नाही असा घणाघात करतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी, जिओची केबल, इंटरनेट फुकट देताय, तर रेशनवर रेशन फुकट द्या! पेट्रोल पंपावर पेट्रोल, भाज्या, दूध सर्व फुकट द्या, असा जबरदस्त

टोला शनिवारी केंद्र सरकारला लगावला.

फायबर केबलच्या माध्यमातून रिलायन्स थेट केबल टीव्ही ग्राहकांच्या घरापर्यंत पोहोचवणार आहे. यामुळे वर्षानुवर्षे ग्राहकांना केबलची सेवा देणाऱया केबलचालकांवर बेकारीची कुऱहाड कोसळणार आहे. या पार्श्वभूमीवर वांद्रे येथील ‘रंगशारदा’ सभागृहात केबलचालकांची बैठक बोलावण्यात आली. या बैठकीला उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. भाषणाच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला बळ द्यायला आलोय, असे उद्धव ठाकरे यांनी सांगताच सभागृह टाळय़ांनी घुमले. ते पुढे म्हणाले, गेली 25-30 वर्षं राब राब राबून व्यवसाय निर्माण केलात; पण तो निर्माण केलेला व्यवसाय अचानक कुणी तरी येऊन तुम्हाला बाजूला करून घेऊन जात असेल तर तुम्ही काय करणार! तुमच्यात असाहय़ता निर्माण होणं साहजिकच आहे. पण मी तुम्हाला खात्री देतो, असं मी काही होऊ देणार नाही, अजिबात होऊ देणार नाही! (टाळय़ा) शिवसेना केबलचालकांच्या पाठीशी खंबीपरणे उभी राहील.

घरामध्ये रोजीरोटी काही नाही, पण सगळं डिजिटल होतंय. डिजिटल इंडिया काय चाटायचाय, व्हॉटस्ऍप किंवा फेसबुकवरून भाजी-भाकरी फॉरवर्ड नाही होऊ शकत. फेसबुकवरून तू काय खातो, मी काय खातो हे विचारणं ठीक आहे; पण ते बघून आपलं पोट नाही भरू शकत. माझं पोट भरायला माझ्या फोनवर नव्हे, तर माझ्या ताटामध्ये भाकरी हवी तर माझं पोट भरणार – उद्धव ठाकरे

‘सेट टॉप बॉक्स’वेळीही भाजप सरकारच होते
त्यावेळी सेट टॉप बॉक्स येणार होते. तेव्हा शिवसेनेने तुमच्यासाठी यशस्वी लढा दिला. पण काय योगायोग आहे माहीत नाही. तेव्हाही भाजपचं सरकार होत, याही वेळी भाजपचं सरकार आहे. तेव्हा अटलजी पंतप्रधान होते तरीदेखील शिवसेनाप्रमुख तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. माझ्यासमोर या चर्चा घडल्या. तेव्हा केंद्रातून जे दूत येत होते त्यांना शिवसेनाप्रमुखांनी सांगितलं की, यांच्या रोजीरोटीला हात लावाल तर याद राखा, नाहीतर मी तुम्हाला सोडणार नाही, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी त्यावेळच्या लढय़ाची आठवण करून दिली.

50 वर्षे फुकट देतो असा करार करा, केबलवाल्यांची जबाबदारी मी घेतो!
केबल, इंटरनेट फुकट देणार आहेत म्हणतात, मग किती काळ फुकट देणार? पुढची 50 वर्षे फुकट देतो म्हणून करार करा, मग केबलचालकांना समजवण्याची जबाबदारी माझी. तुम्हाला कुणी आड येणार नाही. घेऊ ना रे जबाबदारी!, असे उद्धव ठाकरे यांनी म्हणताच ‘हो!’ असे जोरदार उत्तर आले. यावर, मग जर समजा दिलं आता पत्र तर, असा सवाल त्यांनी करताच एकच हंशा पिकला.

सगळं फुकटात, हे चांगलं लक्षण आहे; मोदींनी यातून प्रेरणा घ्यावी!
ही जी सेवा देणार आहेत ती तर फुकटात आहे, मग भांडायचं कशाला असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केबलचालकांना केला. फुकट मिळतेय तर चालेल ना! अरे फुकट देताहेत तुम्हाला. तुम्ही काय असे गप्प, असे विचारताच समोरून, ‘आम्हाला मेहनतीचे हवेय’ असे उत्तर आले. यावर, ‘अरे पण आपल्या घरात आलं तर आपणही गिऱहाईक झालो. केबल सेवा फुकटात मिळतेय हे लक्षण चांगलं आहे. मोदींनी यांच्याकडून प्रेरणा घ्यायला हवी. (हंशा) डिजिटल इंडियात इंटरनेट फुकट मिळत असेल तर रेशनवर रेशन फुकट द्या! पेट्रोल पंपावर पेट्रोल फुकट, भाज्या, दूध सर्व फुकट द्या! मग कशाला उद्योगधंदा करायचा! सगळा फुकटाचा बाजार आहेच!, मग कशाला तुम्ही हवालदिल होता. सगळं घरपोच जर मिळत असेल तर कुणाला नकोय,’ असा टोला त्यांनी लगावला.

केबलचालकांशी करार करा!
आम्ही कुठेही असं म्हणत नाही की, कोणी उद्योगधंदा करू नये. यावं, आणखी दहा जणांनी उतरावं त्यामध्ये; पण ही जी लोकं माझी घराघरात गेलेली आहेत, त्यांची घरंदारं उद्ध्वस्त करून तुम्ही घराघरात नका जाऊ. त्यांची घरंदारं उद्ध्वस्त करू नका, असा दम उद्धव ठाकरे यांनी दिला. ते पुढे म्हणाले, केबलचालक कष्ट करताहेत त्यांना सोबत घ्या. नुसतं आम्ही सोबत घेऊ, या आश्वासनावर मी विश्वास ठेवणार नाही. जर लढा द्यायची वेळ आली आणि लोकशाहीत लढा दिल्याशिवाय काही मिळत नसेल तर तीही आमची तयारी आहे. पण तसं न करता पुढे जायचं असेल तर सर्व केबलचालकांशी बसून आधी करार करा. हे सर्व जे म्हणताहेत त्या करारात ते मान्य करा आणि मग पुढे चला. सगळय़ांनी जर का आनंदात राहायचं असेल तर माझ्या माणसांना सोबत घेऊन चला. त्यांच्या घरादाराला, अन्नाला हात न लावता पुढे चला. आम्ही इतर कुठेही तंगडं घातलेलं नाही, तुम्ही यांच्या तंगडय़ात तंगडं घालू नका, अशी समज उद्धव ठाकरे यांनी ‘जिओ’ कंपनीला दिली.

तुम्हाला न्याय दिल्याशिवाय शांत बसणार नाही !
मी तुम्हाला खात्री द्यायला आलोय, मी तुमच्या सोबत आहे. ही जी तुमची संख्या दिसत आहे ती सगळी कायम एकजुटीने एकवटलेली दिसली पाहिजे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. तुमचा हा लढा मी माझ्यासाठी लढत नाही. लढा लढण्याची वेळ आली तर शिवसेना तुमच्यासाठी मैदानात उतरेल. पण साम दाम दंड भेदाने फूट पाडण्याचा प्रयत्न झाला तर खेळ तिथेच संपला. तुमच्यातली एकजूट कुठेही तुटू देऊ नका. तुम्हाला न्याय दिल्याशिवाय मी शांत बसणार नाही, अशी ग्वाही उद्धव ठाकरे यांनी दिली.

यश मिळाल्यावर पुन्हा मेळावा घेणार
केबल व्यवसायातले बारकावे माहीत असलेला अनिल परब तुमच्यासोबत दिला आहे. कुठली केबल कुठे जाते हे माहीत असलेला माणूस मी तुम्हाला दिलेला आहे. नाइलाजाने लढा द्यायची वेळ आली तर शिवसेना स्वस्थ बसणार नाही. यश तर मिळणारच. उद्याच्या यशाच्या आधीच तुम्हाला शुभेच्छा देतोय. यश मिळाल्यानंतर हा सर्व प्रश्न मिटल्यानंतर जो एक मेळावा करू त्यामध्ये मी तुमच्या सर्वांचा सत्कार केल्याशिवाय राहणार नाही, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले.

…हा तर ‘माऊस ट्रॅप’
ग्राहकांना दिल्या जाणाऱया अशा आश्वासनांना इंग्रजीत ‘माऊस ट्रॅप’ म्हणतात. उंदराला सापळय़ात पकडण्यासाठी लालूच दाखवायचं. मग तो शिरतो त्याच्यात. पिंजऱयात पकडलं गेल्यावर त्याला कळतं की, ही आपल्याला लालूच दाखवली. तसं आधी फुकट देऊन पुढे खेचायचं. बाकीच्यांची सगळय़ांची वाट लावून टाकायची. उद्या केबल व्यवसायात एकाधिकारशाही निर्माण होईल. ती एकदा झाली की रेट वाढवत जायचे, अशी भीती उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.

शिवसेनेच्या ताकदीवरच आपण लढाई जिंकू – अॅड. अनिल परब
आमच्या भरलेल्या ताटात हात घालण्याचा खटाटोप रिलायन्स जिओचा सुरू आहे. केबल चालकांनी उभारलेला त्यांचा व्यवसाय उद्ध्वस्त करण्याचा त्यांचा डाव कदापि शक्य होणार नाही. आतापर्यंत केबलचालकांना आपण एकटे असल्याचे वाटत होते; पण आपण एकटे नाही, तर शिवसेना पक्ष आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या ताकदीवरच ही लढाई आपण निश्चित जिंकू, असा विश्वास ‘केबल ऑपरेटर आणि डिस्ट्रिब्युटर्स असोसिएशन’चे अध्यक्ष व शिवसेना विभागप्रमुख आमदार अॅड. अनिल परब यांनी व्यक्त केला. ‘केबल ऑपरेटर आणि डिस्ट्रिब्युटर्स असोसिएशन’च्या वतीने आमदार अनिल परब यांच्या हस्ते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, आमदार प्रकाश फातर्पेकर, प्रकाश सुर्वे, केबलचालक अजय ओक, राजू पाटील, किशोर घाडिया, मीरा-भाईंदरचे काँग्रेस नगरसेवक राजीव महेश, अशोक सिंग यांच्यासह राज्यभरातील केबलचालक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.