अहमदपूर : विचार विकास मंडळाच्या 29 जणांचे सभासदत्व रद्द

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । अहमदपूर

अहमदपूर येथील विचार विकास मंडळ अहमदपुर द्वारा संचलित महात्मा गांधी महाविद्यालय हे शैक्षणिक क्षेत्रातील नामवंत महाविद्यालय चालवले जाते. या विचार विकास मंडळाचे माजी अध्यक्ष तथा अहमदपूर – चाकूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार महालिंगप्पा सांगविकर आणि माजी आमदार भगवानराव नागरगोजे व इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांचे निधन झाल्यानंतर माजी मंत्री भाई किशनराव देशमुख हे संस्थेचे सचिव असल्याने आपल्या पदाचा व प्रतिष्ठेचा गैरवापर करून स्वतःच्या कुटूंबातील व नात्यातील जवळचे 29 सभासद संस्थेच्या कार्यकारी मंडळात निवडणूक न घेता समाविष्ट करून घेतले. संस्थेला स्वतःच्या कुटुंबाच्या मालकीचे करण्याचा प्रयत्न केला. ही गंभीर बाब लक्षात आल्यानंतर डॉ. अशोक महालिंगप्पा सांगवीकर यांनी या गैरप्रकाराविरुध्द स्वतः व इतर सदस्यांनी चॅरिटी प्रॅक्टिशनर अॅड. एस. टी. जाधव यांच्या मार्फत लातूर येथील उप धर्मादाय आयुक्तांकडे सदर प्रकरणाची दाद मागितली माजी मंत्री भाई किशनराव देशमुख यांनी सदरची संस्था बळकावण्यासाठी कसे एकट्याच्या सहीचे खोटे ठराव तयार करुन त्यांचा खोटा व बेकायदेशीर बद्दल अर्ज दाखल केला. बेकायदेशीर सभासद संस्थेवर पदाधिकारी म्हणून निवडून आल्याचे भासवले. हे गैरकृत्य सुनावणीच्या वेळी सिद्ध करून दाखविल्याने उप धर्मादाय आयुक्त मा. सौ. उषा चव्हाण यांनी संस्थेमध्ये वाढवलेले 29 सभासद फेरचौकशी नंतरही रद्द करून त्याबाबतचा बदल अर्ज अवैध ठरवून रद्द केला. त्यामुळे संस्था खाजगी मालकीची होता होता वाचवली.

सध्या संस्थेच्या अनागोंदी कारभारामुळे महात्मा गांधी महाविद्यालयावर शासनाने शैक्षणिक प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील अग्रगण्य असलेल्या तसेच अहमदपूर पॅटर्न नावाने ओळखल्या जाणाऱ्या महात्मा गांधी महाविद्यालयावर नामुष्कीची वेळ आली आहे.