
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या सुरक्षेवर झालेल्या खर्चाची माहिती आरटीआयखाली उघड करण्यास केंद्रीय गृह मंत्रालयाने स्पष्ट नकार दिला आहे.
अमित शहा यांच्याकडे कोणतेही घटनात्मक किंवा वैधानिक पद नाही तरीही त्यांना जुलै 2014पासून केंद्रीय गृह मंत्रालयाने झेड सुरक्षा पुरवलेली आहे. त्यांच्या सुरक्षेवरील खर्च हा जनतेच्या पैशातून होत असल्याने याबाबतची माहिती मिळणे हा आपला हक्क आहे, अशी भूमिका अर्जदार आरटीआय कार्यकर्ते दीपक जुनेजा यांनी मांडली. शहा हे राज्यसभेचे सभासद नव्हते तेव्हा जुलै 2014मध्ये जुनेजा यांनी आरटीआयखाली हा अर्ज केलेला आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयाने ही माहिती उघड करण्यास नकार दिल्यानंतर जुनेजा यांनी मुख्य माहिती आयोगाकडे धाव घेतली. परंतु माहिती आयोगाने त्यांचे अपील फेटाळले. याला जुनेजा यांनी दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले. तेथे आरटीआय ऍक्टमधील कलम 8(1)च्या ग आणि ज खाली ही माहिती न उघड करणे हा अपवाद करता येईल का, हे प्रथम तपासून पाहा, असे आदेश न्यायाधीश विभू भाकरू यांनी दिले. यानंतर हे प्रकरण पुन्हा मुख्य माहिती आयोगासमोर गेले. या प्रकरणाची पुन्हा मुख्य माहिती आयोग आणि केंद्रीय गृह खात्याने सुनावणी घेतली. तेव्हा कलम 8(1)च्या ग, ज खाली ही माहिती देता येणार नाही, असे गृह खात्याने स्पष्ट केले.
माहिती का दिली नाही?
वैयक्तिक माहिती आणि सुरक्षा याबाबत आरटीआय ऍक्टमध्ये असलेले एक कलम दोन उपकलमे यानुसार वैयक्तिक सुरक्षेसंदर्भात माहिती उघड न करण्यास अपवाद केलेला आहे. सुरक्षेसंदर्भातील माहिती उघड केल्याने कोणत्याही व्यक्तीस धोका उत्पन्न होऊन त्याच्या शारीरिक सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो, असेही गृह खात्याने यासंदर्भात म्हटले आहे.




























































