तिघांना घेऊन ‘गगनयान’ झेपावणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

‘इस्रो’च्या गगनयान अभियानात पहिल्यांदा तीन जण अंतराळात झेपावणार आहेत. ते सात दिवसांसाठी अंतराळात राहतील. गगनयान पृथ्वीच्या खालील कक्षेत 300 ते 400 कि.मी.पर्यंत प्रस्थापित केले जाईल.

गगनयान या बहुचर्चित मोहिमेबद्दल अणुऊर्जा आणि अंतराळ विभागाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी आज माहिती दिली. सिंग म्हणाले, गगनयान लाँच करण्यासाठी जीएसएलव्ही एमके 3 या लाँच व्हेईकलचा वापर केला जाईल. सुरुवातीला मोहिमेची चाचणी करताना मानवरहित दोन गगनयान अंतराळात पाठवले जातील. येत्या 2022 च्या आधी गगनयान अंतराळात जातील अशी आशा सिंग यांनी व्यक्त केली. गगनयानसाठी दहा हजार कोटी रुपयांपेक्षा कमी खर्च होईल, असेही त्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी ‘गगनयान अभियाना’ची घोषणा केली होती. त्यानंतर ‘इस्रो’ने प्रथमच मोहिमेची विस्तृत माहिती आज दिली. ही मोहीम यशस्वी झाल्यास हिंदुस्थान हा अंतराळात मानव पाठवणारा अमेरिका, रशिया आणि चीननंतरचा चौथा देश ठरणार आहे. येत्या चार वर्षांत किंवा त्याही आधी तरुण मुले-मुली अंतराळात तिरंगा फडकवतील, असे सिंग म्हणाले.

इस्रोच्या ‘चांद्रयान 2’ चे जानेवारीत प्रक्षेपण
‘इस्रो’ येत्या जानेवारी महिन्यात ‘चांद्रयान-2’ या महत्त्वाकांक्षी अंतराळ यानाचे प्रक्षेपण करणार आहे. ‘इस्रो’चे संचालक के. शिवन यांनी याबाबत माहिती दिली आहे. शिवन यांच्या मते ‘चांद्रयान 2’ हे सर्वात कठीण अभियान आहे. यामध्ये अंतराळ यानाचे जीएसएलव्ही-एमके-3-एम 1 प्रक्षेपकाद्वारे प्रक्षेपण केले जाणार आहे. ‘चांद्रयान-2’च्या वजनात वाढ होत ते आता 3.8 टन एवढे झाले आहे. त्यामुळे यानाचे जीएसएलव्हीद्वारे प्रक्षेपण करता येणार नाही. गरजेनुसार प्रक्षेपण यान अद्ययावत करून त्याला जीएसएलव्ही-एमके-3 असे रूप देण्यात आले आहे. याचे प्रक्षेपण 3 जानेवारी ते 16 फेब्रुवारीदरम्यान करण्यात येणार आहे. अभियानाबाबत देशभरातील तज्ञांचे मत जाणून घेतल्याचे शिवन यांनी सांगितले. दक्षिण धुवाच्या जवळ जाणारे हे जगातील पहिलेच अभियान आहे.