वांद्रे-वर्सोवा सी लिंकचे काम एका महिन्यात सुरू करा!  मुख्यमंत्र्यांचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

मुंबईतील वाढती वाहतूककोंडी दूर करण्यासाठी वांद्रे ते वर्सोवा सी लिंकचे काम तसेच वाशी खाडीवरील तिसर्‍या पुलाचे बांधकाम एका महिन्यात सुरू करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. तसेच मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील खोपोली ते खंडाळा येथील नवीन मार्गिकेच्या कामालाही यावेळी मंजुरी देण्यात आली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीची बैठक झाली. या बैठकीत वांद्रे- वरळी सी लिंकचे काम तसेच पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील बांधकाम व शीव-पनवेल महामार्गावरील ठाणे खाडीवर वाशी येथे तिसर्‍या पुलाच्या बांधकामास मान्यता दिली. ही तीनही कामे एका महिन्याच्या आत सुरू करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.  

bandra-varsova-link-rd

पश्चिम द्रुतगती महामार्गाला जोडणार

वांद्रे ते वर्सोवा हा सागरी सेतू (सी लिंक) सध्याच्या वांद्रे-वरळी समुद्र सेतूच्या तीन पटीने जास्त लांब असेल. या नवीन सागरी सेतूपासून पश्चिम द्रुतगती महामार्गास जोडणारी वाहतूक व्यवस्था तयार केली जाईल. तसेच वांद्रे बस स्थानकावरून जोडणारा नवीन रस्ता पश्चिम द्रुतगती महामार्गावरून (पार्ले जंक्शन) वर्सोवा नाना-नानी पार्क येथे सागरी सेतूला जोडणारा रस्ता विकसित करण्यात येईल.  

ठाणे खाडीवर तिसरा पूल

ठाणे खाडीवर वाशी येथे तिसर्‍या पुलाच्या बांधकामासही मंजुरी देण्यात आली. या प्रकल्पामध्ये वाशी येथील टोलनाक्याचे विस्तारीकरण व आधुनिकीकरण करून वाहतूक सुरळीत करण्यात येईल. खोपोली ते खंडाळा या घाट लांबीतील नवीन मार्गिकेचे बांधकाम होईल. खालापूर टोलनाक्यापासून कुसगाव (सिंहगड इन्स्टिट्युट) येथे जोडणार्‍या दोन टप्प्यांतील बोगद्यांचे व त्यांना जोडणार्‍या आधुनिक पुलाच्या बांधकामास मंजुरी देण्यात आली. या प्रकल्पातील दोन बोगद्यांची एकूण लांबी 11 कि.मी. असून दोन डोंगरांमधील पुलांची लांबी दोन कि.मी. आहे. देशातील सर्वात मोठा असा 650 मीटरच केबल स्टेड पूल पर्यटकांचे प्रमुख आकर्षण होईल. यामुळे पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतुकीचे अंतर कमी होऊन वेळेची बचत होईल.