वरळीतील ‘फ्लोरा रेस्टॉरंट’ बंद होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

मुंबईतील चायनीज रेस्टॉरंटच्या भाऊगर्दीतही आपले वेगळेपण जपणारे आणि मुंबईत खऱया अर्थाने चायनीज खाद्यसंस्कृती रुजवणारे वरळीतील ऐतिहासिक ‘फ्लोरा रेस्टॉरंट’ 51 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर उद्यापासून खवय्यांचा कायमचा निरोप घेणार आहे. पालिकेने या रेस्टॉरंटची इमारत धोकादायक घोषित केल्याने हे रेस्टॉरंट आता कायमचे बंद होणार आहे. आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आज येथे खवय्यांनी एकच गर्दी केली.

मुंबईत चायनीज खाद्यसंस्कृती रुजवण्यासाठी 1967 साली अँथनी लिओ आणि दोरेतिआ लिओ या दांपत्याने वरळीतील सी फेसजवळ हे रेस्टॉरंट सुरू केले. मुंबईतले दुसरे चायनीज रेस्टॉरंट म्हणून याची ओळख. अमोल पालेकर यांच्या ‘छोटी सी बात’ या सिनेमातील एक गाणेही येथे चित्रित करण्यात आले आहे. येथील चिकन क्लियर सूप, पेपर अॅण्ड सॉल्ट चिकन, सा.पो. चिकन, चिकन काँटोनीस अशा येथील 200हून चमचमीत चायनीज खाद्यपदार्थांनी जवळपास तीन पिढय़ांतील खवय्यांना तृप्त केले आहे. अँथनी लिओ यांच्या निधनानंतर त्यांची 84 वर्षीय पत्नी दोरेतिआ लिओ सध्या या रेस्टॉरंटची जबाबदारी सांभाळत असून दादरच्या जिप्सी हॉटेलचे राहुल लिमये हे त्यांना मदत करत आहेत.

गेली पाच दशके जिभेचे चोचले पुरवणारे फ्लोरा रेस्टॉरंट बंद होत असल्याची खबर पसरताच खवय्ये हिरमुसले आहेत. अनेक जण कुटुंबीय, मित्रमंडळींसोबत येथे भेट देऊन जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत. इथल्या लज्जतदार चायनीज जेवणाच्या आता केवळ आठवणीच उरतील, अशी खंत खवय्यांनी बोलून दाखवली.

सेलिब्रेटींनाही भुरळ
फ्लोरा रेस्टॉरंटमध्ये सर्वसामान्यांसह सेलिब्रेटींचाही राबता असायचा. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, डॉ. डी.वाय. पाटील, पतंगराव कदम अशा राजकीय दिग्गजांसोबत राणा दग्गुबाती, फराह खान, स्वप्नील जोशी, ओम पुरी असे अनेक सेलिब्रेटी आवर्जून इथल्या पदार्थांचा आस्वाद घ्यायचे.

इमारत धोकादायक असल्याने पालिकेने आम्हाला रेस्टॉरंट बंद करण्याची नोटीस पाठवली आहे. सध्यातरी रेस्टॉरंट दुसऱ्या जागी सुरू करण्याचा आमचा विचार नाही.
– अजित पाटील, हॉटेल व्यवस्थापक

आई-बाबांसोबत मी नेहमी या रेस्टॉरंटला भेट द्यायचो. या वास्तूत बालपणीच्या माझ्या अनेक आठवणी दडल्या आहेत. हे रेस्टॉरंट बंद पडणार असल्याचे कळताच आज आवर्जून येथे भेट द्यावीशी वाटली.
– डॉ. तळवलकर

इथल्या जवळपास सगळ्याच पदार्थांची चव मी चाखलीय. मला आजही आठवतंय, लग्नानंतरची पहिली डेट आम्ही येथेच केली होती. त्यामुळे लाडक्या ‘फ्लोरा’ला निरोप देण्यासाठी आज आम्ही दोघे येथे आवर्जून आलो आहोत.
– रिद्धी जानी

summary- flora restaurant in worli to be closed forever