
सामना ऑनलाईन । पुणे
पुणे पोलिसांनी अटक केलेल्या शहरी नक्षलवाद्यांविरोधात जमा केलेल्या पुराव्यांवरून त्यांचा नक्षलवाद्यांशी असलेला संबंध आणि त्यांनी रचलेला कट याबाबत अतिरिक्त पोलीस महासंचालक परमवीर सिंग यांनी पत्रकार परिषद घेत खुलासा केला. एल्गार परिषदे आणि भीमा-कोरेगाव दंगलीनंतर मिलिंद तेलतुंबडेकडे सापडलेल्या पत्रात अनेक आक्षेपार्ह गोष्टी आढळून आल्याचे सिंह यांनी सांगितले. या कागदपत्रातून दिल्लीतील जेएनयूच्या विद्यार्थ्यांना जंगलामध्ये नक्षली प्रशिक्षणासाठी अंडरग्राऊंड करण्यात आल्याची माहिती सिंग यांनी दिली. यानंतर मोठी खळबळ उडाली आहे.
नक्षलसमर्थक ग्रेनेड लाँचर विकत घेण्याच्या तयारीत होते, पोलीस तपासात निष्पन्न
नक्षलवादी समर्थक आणि बंदी घातलेल्या नक्षलवादी संस्थांशी संबंध ठेवणारे वर्नन गोन्साल्विस, अरुण परेरा, वरवरा राव, सुधा भारद्वाज आणि गौतम नवलाखा यांना पुणे पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले. या नक्षल समर्थकांविरोधात पोलिसांना टाकलेल्या धाडीमध्ये अनेक कागदपत्र, लॅपटॉप, त्यांचे पासवर्ड आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले होते. यात सीपीआय (माओवादी) या बंदी घातलेल्या संघटनेने देशात अस्थिरता पसरवण्याचा कट रचल्याचे उघड झाले आहे, असे परमवीर सिंग यांनी स्पष्ट केले. जप्त करण्यात आलेले सर्व पुरावे फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्यात आल्याची माहिती देखील सिंग यांनी दिली.
नक्षल समर्थकांकडून जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रावरून माओवाद्यांचा शस्त्रसाठा विकत घेण्याचा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हत्या करण्याचा तसेच केंद्र सरकार उलथवून टाकण्याचा मोठा कट होता असे परमवीर सिंग यांनी स्पष्ट केले आहे. तसेच वरवरा राव आणि रोना विल्सन यांच्यात झालेला पत्रव्यवहार उलगडला असून या सर्वांचे माओवाद्यांशी घनिष्ठ संबंध आहेत आणि माओवाद्यांना ते पैसाही पुरवत होते, असा दावाही सिंग यांनी यावेळी केला. सुधा भारद्वाज यांनी कॉम्रेड प्रकाशला लिहिलेले एक पत्र सिंग यांनी यावेळी वाचून दाखवले. या प्रकरणी 8 जानेवारीपासून पोलिसांनी चौकशी सुरू असून सुधा भारद्वाज आणि कॉम्रेड प्रकाशनंतर 6 मार्च रोजी यात सुरेंद्र गडलिंग आणि रोना विल्सन ही आणखी दोन नावे जोडली गेल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर चौकशी करून पोलिसांनी 17 एप्रिल रोजी देशात 6 ठिकाणी छापे टाकले. दिल्लीत रोना विल्सन, नागपूरमध्ये सुरेंद्र गडलिंग, मुंबईत सुधीर ढवळे यांच्या घरावर तर अन्य ठिकाणी छापे टाकण्यात आले, असे सिंग यांनी सांगितले. तसेच तेलतुंबडे याच्या पत्रात भीमा- कोरेगाव हिंसाचार भडकवण्यासाठी 5 लाख रुपये दिल्याचा उल्लेख असल्याचेही ते म्हणाले.
































































