पालिका आयुक्तांचा ‘दे धक्का’; विभागप्रमुखांच्या बदल्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी , पुणे

महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख सुरेश जगताप यांच्यासह पाच विभागप्रमुखांच्या बदल्या करण्यात आल्या आहे. वर्षानुवर्षे एकाच विभागात ठाण मांडून बसलेल्या विभागप्रमुखांच्या आयुक्त सौरभ राव यांनी बदल्या करून ‘दे धक्का’ दिला आहे. या विभागप्रमुखांना कार्यमुक्त होऊन लगेचच बदलीच्या ठिकाणचा कार्यभार घेण्याचा आदेश दिला आहे.
घनकचरा व्यवस्थापन विभागाचे जगताप यांना आता उपायुक्त परिमंडळ क्रमांक ४ हे पद देण्यात आले आहे. त्यांच्या जागेवर सहायक आयुक्त ज्ञानेश्वर मोळक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मोळक यांच्याकडे स्थानिक संस्थाकर व परिमंडळ क्रमांक ४चा कार्यभार होता. स्थानिक संस्थाकर कायम ठेवून परिमंडळ क्रमांक ४हून त्यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे. तुषार दौंडकर यांच्याकडील आकाशचिन्ह विभागाचा अतिरिक्त कार्यभार विजय दहीभाते यांच्याकडे देण्यात आला आहे. त्यांच्याकडे परिमंडळ क्रमांक १चा उपायुक्त म्हणून कार्यभार आहे. तो सांभाळून त्यांनी या पदाचा कार्यभार पाहायचा आहे. त्यांच्याकडे पूर्वीही हा विभाग होता.

दौंडकर यांच्याकडेच क्रीडा विभागाचाही अतिरिक्त कार्यभार होता. तो उपायुक्त किशोरी शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. त्यांनीही आपल्या मूळ पदाचा कार्यभार सांभाळून हा नवा कार्यभार पाहायचा आहे. स्थापत्य विभागातील अधीक्षक अभियंता मदन आढारी यांच्याकडील प्रकल्प क्रमांक २चा कार्यभार बदलून त्यांना मलनि:सारण विभागाची देखभाल-दुरुस्ती सोपविण्यात आली आहे. या पदावर कार्यरत असलेले हेमंत देवधर यांना पाणीपुरवठा विभागात बदलण्यात आले आहे. पाणीपुरवठा विभागातील जगदीश खानोरे यांना तेथून बदलून प्रकल्प क्रमांक २ची जबाबदारी देण्यात आली आहे. वित्त व लेखा अधिकारीपदाचा कार्यभार दोन अधिकाऱ्यांकडे देण्यात आला आहे. उल्का कळसकर यांच्याबरोबर आता तुषार दौंडकर यांच्याकडे या पदाचा निम्मा पदभार दिला आहे.

काही विभागप्रमुखांबाबत पदाधिकाऱ्यांची तक्रार होती. कामांना विलंब लावणे, पदाधिकाऱ्यांचे सांगणे टाळणे यामुळे त्यांच्याबाबत पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी होती. बदल्यांवर त्याचा परिणाम दिसून येत आहे. राव यांनी आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर प्रथमच विभागप्रमुखांसह कनिष्ठ अभियंत्यांच्याही बदल्या केल्या आहेत. सर्वांना नव्या पदावर त्वरित रुजू होण्याचा आदेश देण्यात आला असून, राजकीय दबाव िंकवा अन्य मार्गाने बदली टाळण्याचा प्रयत्न केल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याची तंबीही देण्यात आली आहे.