
सामना ऑनलाईन । ग्वाल्हेर
फ्रान्सबरोबर केलेल्या 59 हजार कोटी रुपयांच्या ‘राफेल’ लढाऊ विमानांच्या खरेदी करारावरून गैरव्यवहाराचे आरोप होत असतानाच ‘राफेल’ची तीन विमाने हिंदुस्थानात दाखल झाली आहेत. त्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. ग्वाल्हेर येथे हवाई दलाच्या एअरबसवर ‘राफेल’चे प्रशिक्षण हिंदुस्थानी वैमानिकांना देण्यात येणार आहे, तर फ्रान्सचे वैमानिक हिंदुस्थानी ‘मिराज-2000’चे प्रशिक्षण घेणार आहेत.
‘राफेल’ विमान खरेदी करारावरून केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर काँग्रेससह विरोधी पक्षांनी अनेक वेळा आरोप केले आहेत. या करारामुळे मोदी सरकार घेरले गेले असतानाच राफेलची विमाने हिंदुस्थानात आली आहेत. सरकारने ‘राफेल’बरोबरचा करार पूर्ण करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. ‘राफेल’चे तंत्रज्ञान, कार्यप्रणाली याची माहिती हवाई दलातील वैमानिकांना व्हावी यासाठी तीन दिवसांसाठी ही विमाने फ्रान्सवरून दाखल झाली आहेत.
हिंदुस्थानी वैमानिकांना प्रशिक्षणासाठी फ्रान्सला पाठवणार
हिंदुस्थानी हवाई दलात 36 ‘राफेल’ विमाने सामील करण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. त्यानुसार हिंदुस्थानच्या निवडक प्रशिक्षित वैमानिकांना राफेलच्या प्रशिक्षणासाठी फ्रान्सला पाठवले जाणार आहे.
36 राफेल टप्प्याटप्प्याने येणार
59 हजार कोटी रुपयांच्या खरेदी करारानुसार नोव्हेंबर 2019 ते एप्रिल 2022 या कालावधीत 36 राफेल विमाने हिंदुस्थानात येणार आहेत. ती टप्प्याटप्प्याने हिंदुस्थानी हवाई दलात सामील होणार आहेत. इंडो-फ्रान्स संरक्षण सहकार्य करारानुसार हिंदुस्थान आणि फ्रान्स एकमेकांना लढाऊ विमानांच्या उड्डाणाचे व तांत्रिक प्रशिक्षणाची देवाणघेवाण करणार असल्याचे फ्रान्सच्या हिंदुस्थानातील राजदूतांनी स्पष्ट केले आहे. फ्रान्स त्यांच्याच ‘मिराज-2000’ या हिंदुस्थानी ताफ्यात सामील झालेल्या विमानाचे नूतनीकरण कार्यही पार पाडणार आहे.



























































