महाराष्ट्रावर विघ्न! आर्थिक घडी बिघडली!!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

देशाच्या तिजोरीत तब्बल 30.5 टक्के महसूल एकटय़ा मुंबईतून जमा होतो. मात्र त्याच महाराष्ट्राची आर्थिक घडी पूर्णपणे बिघडून गेली असून महाराष्ट्रावर आर्थिक विघ्न आल्याचे शिक्कामोर्तब खुद्द केंद्र सरकारच्या 15व्या वित्त आयोगानेच केले आहे. 2009 ते 13 या काळात महाराष्ट्राच्या महसूलवाढीचा वेग 17.69 टक्के होता. 2014-17 या वर्षात 11.05 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. महसूल उत्पन्नापासून करसंकलनापर्यंत सर्वच आर्थिक आघाडय़ांवर महाराष्ट्र पिछाडीवर गेल्याचे वित्त आयोगाने म्हटले आहे.

देशातील प्रगत राज्य असलेल्या महाराष्ट्राची आर्थिक आघाडय़ांवर दुरवस्था का झाली? याची पाहणी करण्याकरिता 15व्या वित्त आयोगाचे चेअरमन एन. के. सिंग आणि आयोगाच्या सदस्यांचे शिष्टमंडळ तीन दिवसांच्या मुंबई दौऱयावर येत आहे. सोमवारपासून (दि. 17) तीन दिवस हे शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध पक्षांच्या नेत्यांची भेट घेणार आहे. उद्योग आणि व्यापार प्रतिनिधी, स्थानिक स्वराज्य संस्था पदाधिकाऱयांशीही चर्चा करणार आहे. तत्पूर्वी वित्त आयोगाने महाराष्ट्राची आर्थिक घडी बिघडल्याचा अहवाल प्रसिद्धीस दिला आहे. महाराष्ट्राचे हे आर्थिक चित्र चिंता वाढवणारे आहे.

उत्पन्नात मोठी घट
– राज्याच्या महसुली उत्पन्नाचा वेग 2014 पासून मंदावला आहे. 2009 ते 2013 या काळात हा वेग 17.69 टक्के होता. 2014 ते 2017 या अवघ्या तीन वर्षांत महसुली उत्पन्नाचा वेग 11.05 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.
– महाराष्ट्राला विविध करांमधून मिळणाऱया उत्पन्नाचा वेग 2009-13 या काळात 19.44 टक्के होता. 2014-17 मध्ये 8.16 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.
– भांडवली खर्च 2013-17 मध्ये 11 ते 12 टक्के आहे. n महाराष्ट्राच्या 5व्या वित्त आयोगाच्या शिफारसींची अंमलबजावणी 2014-15 पासूनच सुरू व्हायला हवी होती. मात्र महाराष्ट्रात चौथ्या राज्य वित्त आयोगाचा अहवालच अद्याप प्रलंबित आहे.

विकासाचा असमतोल; विदारक स्थिती
– देशाच्या विकासात मुंबईचा सिंहाचा वाटा असताना महाराष्ट्रातील अनेक जिल्हय़ांची स्थिती विदारक आहे.
– महाराष्ट्रातील 34 जिल्हय़ांचे दरडोई उत्पन्न देशाच्या आणि राज्यातील सरासरीच्या खाली आहे. 34 मधील 16 जिल्हे हे मराठवाडा आणि विदर्भातील आहेत.
– राज्यात 351 डेव्हलपमेंट ब्लॅक आहेत. त्यातील 125 ब्लॅक हे मानवी विकास निर्देशांकानुसार सामाजिकदृष्टय़ा मागास आहेत.
– 2011-12 मध्ये तेंडुलकर समितीने दिलेल्या अहवालानुसार महाराष्ट्रात दारिद्रय़ रेषेचा दर 17.32 टक्के आहे.
– महाराष्ट्रात अनुसूचित जाती, अनुसूचित जमातींची लोकसंख्या 21.2 टक्के आहेत. यातील 7.9 टक्के लोकांनाच घरे आहेत.
– अनुसूचित जमातींमध्ये गरिबीचा दर वेगाने वाढतो आहे.
– महाराष्ट्राची राजधानी मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. देशाच्या एकूण जीडीपीमध्ये (सकल घरेलू उत्पन्न) एकटय़ा मुंबई शहराचा वाटा 2.5 टक्के आहे, तर राज्याचा वाटा 15 टक्के आहे. केंद्राच्या तिजोरीत करांमधून जमा होणाऱया महसुलामध्ये मुंबईचा वाटा तब्बल 30.5 टक्के आहे.

फक्त 18 टक्के जमीन सिंचनाखाली
देशातील एकूण पाटबंधारे प्रकल्पांपैकी तब्बल 35 टक्के प्रकल्प महाराष्ट्रात आहेत. परंतु सिंचनाखाली जमीन केवळ 18 टक्के आहे.

महापालिका, नगरपालिकांना सरकारचा कमी निधी
– निधी वाटपात राज्य सरकारकडून भेदभाव केला जातो. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचे 45.23 टक्के शहरीकरण झाले आहे. पण महापालिका, नगरपालिकांना राज्याकडून खूप कमी निधी दिला जातो.
– राज्याच्या एकूण उत्पन्नातील 20 टक्के महसूल स्थानिक स्वराज्य संस्थांना दिला जातो. मात्र मंजूर निधीतील 78 टक्केच निधी पंचायत राज्यसंस्थांना मिळत आहे.

आत्महत्या वाढल्या, शेतकऱयांची दुरवस्था
अपूर्ण पाटबंधारे प्रकल्पांच्या खर्चात वाढ झाली असून जमीन अधिग्रहणाचा प्रश्नही वाढला आहे.