
सामना ऑनलाईन । श्रीनगर
जम्मू-कश्मीरात कुलगाम जिल्ह्यात शनिवारी लष्कर-ए-तोयबा आणि हिजबूल मुजाहिदीनच्या पाच दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. यात बँकेची कॅश व्हॅन लुटून पाच पोलीस आणि दोन बँक कर्मचाऱ्यांची हत्या करणारा दहशतवादी गुलजार अहमद पादारला कंठस्नान घालण्यात आले आहे. कश्मीर खोऱ्यातील अनेक बँक लुटीमध्ये गुलजार अहमद ‘मोस्ट वॉण्टेड’ होता. दरम्यान या चकमकीवेळी स्थानिक माथेफिरू नागरिकांनी जवानांवर दगडफेक केली. यावेळी जवानांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडीत गोळीबार केला. त्यात एक नागरिक ठार आणि 10 जण जखमी झाले आहेत.
कुलगाम जिल्ह्यात काझीगुंड परिसरात दहशतवादी लपल्याची माहिती शुक्रवारी रात्री लष्कराला मिळाली. सीआरपीएफ आणि लष्कराच्या जवानांनी शुक्रवारी रात्रीपासून काझीगुंड परिसरात ऑपरेशन सुरू केले. सुरुवातीला स्थानिक नागरिकांना सुरक्षितस्थळी हालविले. चकमकीत पाच दहशतवाद्यांचा खात्मा केला. हे दहशतवादी कुलगाम आणि अनंतनाग जिल्ह्यातील आहेत. लष्कर-ए-तोयबा आणि हिजबुल मुजाहिदीनचे हे दहशतवादी होते.चकमकीवेळी काझीगुंड परिसरात कडेकोट सुरक्षा तैनात करण्यात आली होती. खबरदारीचे उपाय म्हणून बारामुल्ला-काझीगुंड रेल्वे सेवा बंद करण्यात आली. तसेच इंटरनेट सेवाही बंद केली होती.
कॅश व्हॅन लुटून पोलिसांची हत्या करणाऱ्या गुलजार अहमदचा खात्मा
कंठस्नान घालण्यात आलेल्या पाच दहशतवाद्यांमध्ये हिजबुल मुजाहिदीनचा खतरनाक दहशतवादी गुलजार अहमद पादार ऊर्फ सैफचा समावेश आहे. 1 मे 2017 रोजी बँकेच्या कॅग व्हॅनवर गुलजार अहमदने हल्ला केला होता. यात पाच पोलीस शहीद झाले होते. दोन बँक कर्मचाऱ्यांचाही मृत्यू झाला होता. तसेच कुलगाम येथे एका पोलीस अधिकाऱ्याची हत्या केली होती. कश्मीर खोऱ्यातील अनेक बँक लुटींमध्ये गुलजार अहमद होता. पोलिसांची शस्त्रास्त्र पळविण्याचा गुन्हाही त्याच्यावर होता. मोस्ट वॉण्टेड गुलजार अहमद सुरक्षा दलाच्या हिटलिस्टवर होता.

























































