
सामना प्रतिनिधी । नांदेड
विष्णुपूरी परिसरातील विद्यापीठाच्या जुन्या मुख्यद्वारासमोर असलेल्या व्यापारी संकुलातील ए.टी.एम. चोरट्यानी शनिवारी रात्री गॅस कटरने फोडण्याचा प्रयत्न केला. नांदेड ग्रामीण पोलिसांनी एटीएममधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये प्राप्त चोरट्याचा फोटा जनतेच्या माहितीसाठी प्रसिद्ध केला आहे.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी जनतेला आवाहन केले आहे की, या चोरट्याला कोणी ओळखत असेल तर नांदेड ग्रामीण पोलिसांशी संपर्क साधून त्याची माहिती द्यावी.
नांदेडच्या विष्णुपूरी भागातील एसबीआयचे एटीएम चोरट्यानी फोडण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी गॅस कटरचा उपयोग केला. पण चोरट्यांना त्यात यश आले नाही आणि त्या एटीएममध्ये असलेली दहा लाख रुपये रक्कम वाचली. रविवारी दिवसा या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यानंतर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी या एटीएममध्ये असलेल्या सीसीटीव्ही फुटेज आधारावर चोरट्याचा एक फोटो जाहीर केला आहे. या फोटोमध्ये दिसणाऱ्या चोरट्याला कोणी ओळखत असेल तर त्यांनी नांदेड ग्रामीण पोलीसांशी संपर्क साधावा आणि चोरट्याबद्दलची माहिती द्यावी असे आवाहन पोलीसांनी केले आहे.

























































