
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी इम्रान खान आल्याने पाकिस्तानची धोरणे फार बदलतील अशी अपेक्षा करणे चुकीचे ठरेल. आजही पाकिस्तानच्या सत्तेची सूत्रे अप्रत्यक्षरीत्या लष्कराकडेच आहेत ,असा हल्लाबोल हिंदुस्थानचे परराष्ट्र राज्यमंत्री आणि माजी लष्करप्रमुख जनरल व्ही. के. सिंग यांनी केला आहे. पाकिस्तानी सीमांवरून होणाऱ्या घुसखोरीबाबत सिंग बोलत होते.
इम्रान खान पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी आल्यानंतर हिंदुस्थानने “वेट अँड वॉच”चे धोरण ठेवलेले आहे. पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुणीही येवो पण सत्तेची सूत्रे मात्र लष्कराच्याच हाती असतात हा आजवरचा अनुभव आहे ,असे सांगून सिंग म्हणाले, इम्रान सरकार सत्तेत आल्यावर सीमांवरील घुसखोरी आणि युद्धबंदीचे प्रकार थांबलेले नाहीत. इम्रान लष्कराच्या नियंत्रणात राहतात की नाही हा पुढचा प्रश्न आहे. आम्ही नेहमीच मैत्रीसाठी आशावादी आहोत ,समोरूनही तसाच सकारात्मक प्रतिसाद मिळायला हवा.”फिक्की”ने आयोजित केलेल्या स्मार्ट बॉर्डर मॅनेजमेंट परिसंवादावेळी सिंग यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली .
हिंदुस्थानने इंडो -पाकिस्तान मैत्रीसाठी नेहमीच सकारात्मक धोरण ठेवलेले आहे. उभय देशांतील वाद मिटवण्यासाठी पाकिस्तानने आधी हात पुढे करावा. आम्ही त्यांना नक्कीच उत्तम प्रतिसाद देऊ. उभय देशांतील बोलणी मात्र मुक्त आणि प्रामाणिक धोरणांनी व्हावीत एवढीच आमची अपेक्षा आहे ,असेही सिंग यांनी स्पष्ट केले. इम्रान खान यांच्या सरकारने आधी पाकिस्तानी सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादी कारवाया प्रामाणिकपणे रोखाव्यात ,मग आम्ही त्यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करू. पाक सरकार दहशतवाद संपविण्याची मानसिकता ठेवणार असेल तरच उभय देशांतील संबंध सुधारतील ,असे खडे बोल या आधी हिंदुस्थानच्या संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी पाकिस्तानला सुनावले होते.
























































