पाकिस्तान सरकारचा आडमुठेपणा,  इथे दुर्बिणीतून घ्यावे लागते गुरुद्वाराचे दर्शन!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

गेल्या काही दिवसांपासून पंजाबच्या गुरदासपूर जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमारेषेकर थोडे वेगळे चित्र आहे. सीमेवर बीएसएफने एक दर्शनस्थळ उभारले असून तिथे शीख भाविकांची लांबच्या लांब रांग लागलेली दिसते. या दर्शनस्थळावर दररोज देशभरातून मोठ्या संख्येने शीख भाविक दर्शनासाठी दाखल होत आहेत. बीएसएफने उभारलेल्या या दर्शनस्थळावर एक दुर्बिण ठेवण्यात आली असून शीख भाविक या दुर्बिणीतून समोर पाकिस्तानच्या हद्दीत असलेल्या करतारपूर साहिब या गुरुद्वाराच्या कळसाचे दर्शन घेत आहेत.

रवी नदीच्या पलीकडे पाकिस्तानच्या नारोवाल जिल्ह्यात हा गुरुद्वारा आहे. सीमारेषेपासून 4.5 किलोमीटर आत पाकिस्तानमध्ये हे गुरुद्वार आहे. या गुरुद्वारामध्ये गुरुनानक 1522 साली वास्तव्यास आले होते. तिथे ते 17 वर्षे राहिले. त्याच जागी पुढे गुरुद्वारा बांधण्यात आला. जगभरातल्या शीख धर्मिर्‍यांसाठी हे अत्यंत पवित्र तीर्थस्थळ आहे.

गेल्या महिन्यात पंजाब सरकारमधील मंत्री नवज्योतसिंग सिद्धू पंतप्रधान इम्रान खान यांच्या शपथविधीच्या सोहळ्यासाठी पाकिस्तानला गेले होते. त्यावेळी पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी पुढच्या वर्षी गुरुनानक यांच्या 550 व्या जयंतीनिमित्त डेरा बाबा नानक ते करतारपूर साहिब गुरुद्वारापर्यंतचा मार्ग खुला करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतरच इथे दर्शनासाठी गर्दी वाढू लागली आहे. मागच्या आठवडय़ात पाकिस्तानचे माहिती मंत्री फवाद अहमद चौधरी म्हणाले की, इम्रान खान सरकार हिंदुस्थानातील शीख बांधवांना करतारपूर साहिब येथे व्हिसामुक्त प्रवेश देण्यावर विचार करत आहे. सध्या शीख भाविक हिंदुस्थानातूनच दर्शनस्थळावरून दुर्बिणीच्या सहाय्याने करतारपूर साहिब गुरुद्वाराच्या कळसाच्या दर्शनावर समाधान मानत आहेत.

प्रत्येक शीख दररोज प्रार्थना करताना नानकांना साहिब आणि पाकिस्तानातील अन्य गुरुद्वारांमध्ये कुठल्याही अडथळ्याशिवाय प्रवेश मिळावा अशी प्रार्थना करत असतो. आमची इच्छा लवकरच पूर्ण होईल असे वाटते अशा भावना पटियाला येथील भाविक बलजिंदर कौर यांनी व्यक्त केल्या.

  • गेल्या काही दिवसांपासून गुरुनानक करतारपूर साहिब गुरुद्वाराचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून शीख बांधव गर्दी करीत आहेत.
  • पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी पुढच्या वर्षी गुरुनानक यांच्या 550 व्या जयंतीनिमित्त डेरा बाबा नानक ते करतारपूर साहिब गुरुद्वारापर्यंतचा मार्ग खुला करण्याचे आश्वासन दिले होते.
  • सध्या भाविकांना बीएसएफच्या दुर्बिणीतून फक्त सफेद रंगातील गुरुद्वारा आणि त्याच्या गोलाकार घुमटाच्या दर्शनावर समाधान मानावे लागत आहे.