
सामना प्रतिनिधी । मुंबई
म्हाडाच्या जागेवर उभ्या राहत असलेल्या इमारतींचे ठेकेदार निविदेतील शर्ती आणि अटींचा भंग करत असल्याने घरे तयार होण्यास विलंब होत असून परिणामी घरांच्या किमतीत वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. यावर नियंत्रण आणण्यात येईल, असे म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी सांगितले.
म्हाडाच्या मुंबई मंडळाने 2015 ते 2019 या कालावधीत 10 हजार 576 घरे बांधण्याचे उद्दिष्ट ठेवले असताना आतापर्यंत केवळ 2 हजार घरेच बांधल्याचे म्हाडा अधिकाऱयांसोबत घेतलेल्या आढावा बैठकीत निदर्शनास आले आहे. त्यामुळे जास्तीत जास्त घरे निर्माण करण्यासाठी म्हाडाच्या मोकळ्या भूखंडावर झालेले अतिक्रमण काढण्यास प्राधान्य देण्यात येईल, असे उदय सामंत यांनी सांगितले.
अतिक्रमणांवर हातोडा
म्हाडाच्या 56 वसाहतींत मोठय़ा प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. त्यामुळे म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासात अडथळा येत आहे. म्हाडाला नियोजन प्राधिकरणाचा दर्जा मिळाला आहे. अतिक्रमणावर कारवाई करण्याचे अधिकार म्हाडाकडे आले असल्याने अतिक्रमण निर्मूलन विभाग तयार करण्यात येणार असून त्यासाठी म्हाडात एक उपजिल्हाअधिकारी आणि तीन तहसीलदार नियुक्तीसाठी राज्य सरकारकडे मागणी करण्यात येणार असल्याची माहिती सामंत यांनी दिली.




























































