डोंबिवलीच्या आर्च फार्मालॅब्स कंपनीत स्फोट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । डोंबिवली 

एकीकडे गणेशोत्सवाची सर्वत्र धामधूम सुरू असतानाच एमआयडीसी भागातील आर्च फार्मालॅब्स कंपनीत मध्यरात्री पावणेदोनच्या सुमारास जबरदस्त स्फोट झाला. चेंबर फुटल्यामुळे ही घटना घडली असून हादऱ्यांमुळे निवासी भागातील इमारतींच्या काचा फुटल्या. तसेच कंपनीतील सिलिंग कोसळले. सुदैवाने कंपनीतील कामगार बाहेर पळाल्याने जीवितहानी टळली. एमआयडीसीमध्ये आग तसेच स्फोटांच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्याने अवघी डोंबिवली जणू स्फोटांच्या उंबरठ्यावर उभी असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

सागाव येथील एमआयडीसीमधील फेज 2 मध्ये 1970 पासून आर्च फार्मालॅब्स लिमिटेड ही आंतरराष्ट्रीय कंपनी असून तेथे औषधनिर्मितीसाठी लागणारे रसायन तयार होते. रात्री पावणेदोनच्या सुमारास काही कामगार  काम करत असताना अचानक मोठा आवाज होत स्फोट झाला आणि एकच पळापळ सुरू झाली. आवाजामुळे काही कामगार प्रसंगावधान राखून बाहेर आले. आवाजाची तीक्रता एवढी मोठी होती की, स्लॅबचा काही भाग खाली पडला, तर अन्य साहित्यदेखील हादरले. आजूबाजूला असलेल्या इमारतींच्या काचा फुटल्या. मात्र कोणतीही जीवितहानी झाली नाही, तसेच कुणी जखमीही झाले नाही. दरम्यान औद्योगिक सुरक्षा विभागाचे उपसंचालक सु.शा. जोशी यांच्या टीमने आज कंपनीने भेट दिली. तसेच  घटनेची माहिती करून घेतली.

प्रोबेस स्फोटाच्या आठवणी जाग्या झाल्या…

डोंबिवली एमआयडीसीमध्ये 660 विविध प्रकारच्या कंपन्या असून तेथे नेहमी कोणत्या ना कोणत्या दुर्घटना घडत असतात. मध्यरात्री झालेल्या  आर्च फार्मालॅब्स या कंपनीतील स्फोटामुळे दोन वर्षांपूर्वी झालेल्या प्रोबेस कंपनीतील भीषण स्फोटाच्या आठवणी जाग्या झाल्या. या स्फोटात 9 जणांचा बळी गेला तर 180 जण जखमी झाले. सुमारे साडेसात कोटींचे नुकसान झाले असून अजूनपर्यंत त्याची कोणतीही भरपाई मिळालेली नाही.

सारे संशयास्पद

आर्च फार्मालॅब्स कंपनीत स्फोट का झाला हे अद्याप कळू शकले नाही. मात्र हा संशयास्पद प्रकार असून कंपनीच्या आत सुरक्षारक्षकांनी कोणालाही जाण्यास मनाई केली आहे. औद्योगिक विभागातील रस्ते, दिवाबत्ती व कचरा या गोष्टींकडे औद्योगिक विकास मंडळ तसेच महापालिका नीट लक्ष देत नाही.

– भाऊसाहेब चौधरी,  उद्योजक व नाशिक जिल्हा संपर्क नेते.

ही तर धोक्याची सूचना..

एमआयडीसीमधील कारखान्यांमध्ये खरे तर अशा घटना होऊ नयेत. हे मान्य असले तरी संबंधित व्यवस्थापनाने पुरेशी काळजी घेणे गरजेचे आहे. कामगारांना प्रशिक्षण दिले जाते, तरीही स्फोटासारखी घटना ही धोक्याची सूचना असून त्याचा विचार करण्याची वेळ आली आहे.

– श्रीकांत जोशी, ‘कामा’ माजी अध्यक्ष.