पारसिक बोगद्याला चारशे इंजेक्शन, पाण्याची गळती रोखण्यासाठी अक्सीर इलाज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

पारसिक बोगद्याची गळती रोखण्यासाठी मध्य रेल्वेच्या मदतीला कोकण रेल्वे धावून आली आहे. गेल्या काही वर्षांपासून पारसिकच्या बोगद्यात होणारी पाण्याची गळती कोकण रेल्वेचे तंत्रज्ञान वापरून 80 टक्क्यांपर्यंत रोखण्यात मध्य रेल्वेला यश आले आहे.

मध्य रेल्वेच्या जलद मार्गावर ठाणे ते कल्याणदरम्यान मुंब्रा येथे 1916 रोजी बांधलेला ब्रिटिशकालिन पारसिक बोगदा आहे. गेले काही वर्षे त्यातून पाणी गळत असल्याने रेल्वे प्रशासन चिंतेत होते. त्यामुळे ही गळती रोखण्यासाठी मध्य रेल्वेने आपल्या इंजिनीयर्सना कामाला लावले होते. त्यासाठी गेल्या वर्षी सेंट्रल मायनिंग रिसर्च इन्स्टिटय़ूटच्या तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले होते.

सेंट्रल मायनिंग रिसर्च इन्स्टिटय़ूटच्या तज्ज्ञांनी दिलेल्या अहवालाचा अभ्यास केल्यानंतर अशा प्रकारच्या कामासाठी कोकण रेल्वे तरबेज असल्याचे अधिकाऱयांना समजले. अखेर या मोहिमेसाठी कोकण रेल्वेच्या इंजिनीयर्सना मध्य रेल्वेने पाचारण केले. कोकण रेल्वेच्या तंत्रज्ञानी कोकणात कोकण रेल्वेचे प्रचंड मोठे बोगदे खणताना तसेच जम्मू-कश्मीरमध्ये रेल्वेचे बोगदे खणताना हे तंत्र यशस्वीपणे वापरले आहे.

साडेचार कोटी रुपयांचा खर्च

हे केमिकल एकदा दगडांच्या भेगांमध्ये शिरले की त्याचे एकप्रकारचे संरक्षक कवच तयार होते, परंतू पाणी वाहून जाण्यासाठी पाइप्स टाकण्यात आले आहेत. या संपूर्ण मोहिमेसाठी साडेचार कोटी रुपयांचा खर्च आला आहे.

1.2 किलोमीटर लांबीच्या पारसिक बोगद्याच्या मुंबई दिशेकडील 200 मीटर भागात पाण्याचे झरे डोंगरातून खाली कोसळत असल्याने हा भाग सर्वात गळतीचा असल्याचे तंत्रज्ञांना आढळून आले. जेथून पाण्याची गळती होत आहे अशा ठिकाणी खडकांच्या भेगा बुजविणे गरजेचे होते. मग दर 1.25 ते 2 मीटरमागे पाच मीटर खोलीचे सुमारे 400 छिद्रे ड्रील मशीनने खणण्यात आली आणि त्यात पॉलियुरेथीन नावाचे केमिकलचे मिश्रण इंजेक्शनद्वारे मोठय़ा प्रेशरने भरण्यात आले.