सेनगाव तालुक्यात शेतकऱ्यांनी लावली उभ्या पिकाला आग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। हिंगोली

इंधन दरवाढीमुळे मळणीयंत्राचा वाढलेला खर्च, पावसाअभावी करपून गेलेले पीक. यामुळे उत्पादन खर्चही निघणे जिकरीचे झाल्यामुळे सेनगाव तालुक्यातील आजेगाव येथील हताश झालेल्या चार शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या उभ्या पिकाला आग लावल्याची घटना समोर आली आहे. तर काही शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या पीकात पशुधनाला चराईसाठी सोडुन दिल्याचा प्रकारही घडला आहे.

सरकारी सुलतानी आणि निसर्गाची अस्मानी अशा दुष्टचक्राचा सामना बळीराजाला करावा लागत आहे. गेल्या महिनाभरापासुन पावसाने ओढ दिल्यामुळे सोयाबीनसह अन्य पीके करपू लागली आहेत. सेनगाव तालुक्यातील आजेगाव येथील शेतकरी धोंडु गोरे, राजु चौधरी, धनेश अवस्ती, रामु डोळस यांनी त्यांच्या २० ते २५ एकर शेतात सोयाबीनची पेरणी केली होती. सुरुवातीच्या पावसामुळे पीकाने बाळसे धरले होते. मात्र, महिनाभरापासून पावसाने ओढ दिल्यामुळे या चारही शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन करपले. तसेच डिझेलची दरवाढ झाल्यामुळे मळणीयंत्रातुन काढायचा पोत्यामागचा दरही वाढला आहे. सोयाबीनला लागवडीसाठी येणारा खर्च देखील निघणे मुश्कील झाल्यामुळे या चार शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतातील पीकाला आग लावली. तसेच सोयाबीनचे पीक उपटुन टाकण्याचा निर्णय घेतला. काही शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या पीकात गुरे-ढोरे चराईसाठी सोडली आहेत. दरम्यान, या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तसेच पीकविमा देण्याची मागणी होत आहे.