
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
ज्येष्ठ कवी, पत्रकार आणि हिंदी अकादमीचे उपाध्यक्ष विष्णू खरे यांचे निधन झाले. गेल्या आठवडय़ात त्यांना ब्रेन हॅमरेज झाल्याने दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. विष्णू खरे मुंबईत राहत होते. मात्र, दिल्ली हिंदी अकादमीच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांचे दिल्लीतच वास्तव्य होते. दिल्लीत मयूर विहारमध्ये ते राहत होते. ते उत्तम कविता लिहीत. याशिवाय खरे यांनी अनुवादक, चित्रपट समीक्षक, पटकथा लेखक आणि पत्रकार म्हणून कामगिरी बजावली आहे.
मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे विष्णू खरे यांचा जन्म झाला. इंदूरच्या ख्रिश्चन कॉलेजमधून त्यांनी इंग्रजी साहित्यातून एम.ए. पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी हिंदी पत्रकारितेतून आपल्या करिअरला सुरुवात केली. सुरुवातीला ‘दैनिक इंदूर’मध्ये उपसंपादकपदी त्यांनी काम केले. त्यानंतर खरे ‘नवभारत टाइम्स’चे संपादक झाले. त्यांच्या निधनाने साहित्य व पत्रकार जगतात हळहळ क्यक्त होत आहे.
खरे यांच्या ‘आलोचना की पहली किताब’ या ग्रंथावर साहित्यजगतात चर्चा झाली. त्यांच्या साहित्यातील योगदानामुळे त्यांना साहित्यिक योगदान पुरस्कार, रघुवीर सहाय्य स्मृती पुरस्कार, भवानी प्रसाद मिश्र स्मृती पुरस्कार आणि मध्य प्रदेश शिखर सन्मान पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
























































