
सामना प्रतिनिधी । मुंबई
ऐन गणेशोत्सवामध्ये बुधवारी सकाळी विक्रोळी व्हिलेज येथे तासभर वीज गेल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. आदानी इलेक्ट्रिकने वीज वाहिनीमधील तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यासाठी दुपारी दोन वाजता वीजपुरवठा खंडित करणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र अचानक सकाळी पावणेअकरा वाजता वीजपुरवठा खंडित करून काम हाती घेतल्याने सकाळची गणपतीची आरती, पूजा अनेकांना अंधारातच उरकावी लागली.
मुंबईत सर्वत्रच गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. त्यामुळे या उत्सव काळात तरी वीजपुरवठा खंडित होऊ नये अशी गणेशभक्तांची अपेक्षा होती. तरीही तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यासाठी दुपारी वीज जाणार असल्याचे आदानी इलेक्ट्रिकने स्पष्ट केल्याने येथील ग्राहकांनी मानसिक तयारी केली होती. मात्र त्याआधीच बत्ती गूल झाली. याबाबत आदानी इलेक्ट्रिकडे विचारणा केली असता विक्रोळी व्हिलेजमधील तीनशेहून अधिक वीजग्राहकांना वीजपुरवठा करणाऱया लो टेन्शन वायरमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी सकाळी पावणेअकरा वाजल्यापासून केवळ अर्धा तास परिसरातील वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला होता असे स्पष्ट केले आहे.

























































