
सामना प्रतिनिधी । नांदेड
कृष्णुर येथील बहुचर्चित असा धान्य घोटाळा उघडकीस येऊन दीड महिना झालेला असतानाही या गुन्ह्यातील आरोपी अद्याप सापडले नाहीत. त्यामुळे या गुन्ह्यातील आरोपींच्या संपत्तीवर टाच लावण्याची कारवाई पोलिसांनी केली आहे.
या कारवाईनंतर आरोपींचे बँक खातेही सील करण्यात येणार असून, याबाबत बँकांना आदेश देण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तत्कालीन पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मिना यांच्या पथकाने 18 जुलैला कृष्णुर येथील इंडिया मेगा अॅग्रो अनाज लि. या कंपनीवर छापा मारून धान्यासह ट्रक जप्त केले होते. या प्रकरणात कंपनीचे मालक अजयकुमार बाहेती, कंपनीचे व्यवस्थापक प्रकाश तापडीया, पुरवठा वाहतुकदार राम पारसेवार यांच्यासह ट्रक चालक आदी १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच तत्कालीन जिल्हा पोलीस अधिक्षक चंद्रकिशोर मिना यांनी सादर केलेल्या अहवालात नमुद असलेल्या कंपन्यांचे मालक कपील पोकर्णा, विजय पोकर्णा व हिंगोली येथील ललित खुराणा हे आरोपी पोलिसांच्या हाती अद्याप न लागल्याने त्यांचे बँक खाते गोठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

























































