लवकर चढा नाहीतर दात तोडेन, बस ड्रायव्हरची वृद्ध दांपत्याला धमकी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, पुणे

आर्थिक तोट्यात गुरफटलेल्या पीएमपीएमएलचे वाहक आणि चालक इतके उद्दाम झालेत की त्यांनी ज्यांच्या जीवावर सेवा सुरू आहे त्या प्रवाशांनाच धमकवायला सुरूवात केली आहे. मंगळवारी एका वृद्ध दांपत्याला चालकाने दात तोडण्याची धमकी दिल्याने पुण्यातील प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. शरद आणि सुधा महाजन यांच्यासोबत झालेला प्रकार उघडकीस आल्यानंतर बस प्रशासनावर टीकेची झोड उठली आहे.

मंगळवारी चार वाजेच्या सुमारास महाजन दांपत्याने पुणे महापालिकेजवळून सांगवीला जाण्यासाठी बस पकडली. गणेशोत्सव साजरा करण्यासाठी ते सांगवीला जात होते. वयामुळे त्यांना बसमध्ये चढणं अवघड जात होतं. बसमध्ये चढल्यानंतरही सीटवर बसण्यासाठी त्यांना वेळ लागला. यामुळे बसचालक भडकला होता, त्याने या दांपत्याशी भांडायला सुरूवात केली. भांडणादरम्यान त्याने धमकी दिली की बस जोरात नेईन आणि असा ब्रेक मारेन की तुम्ही खाली पडाल आणि तुमचे दात तुटतील. या चालकाची ओळख पटली असून त्याचे नाव लहू सुर्वे असल्याचं कळालं आहे. महाजन दांपत्याच्या मुलाने सुर्वे विरोधात पीएमपीएमलच्या अध्यक्षा नयना गुंडे यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.