
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
आंतरराष्ट्रीय बाजारापेठेतील इंधनाचे दर, डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण याचा एकूण परिणाम हा पेट्रोल आणि डिझेलवर दिसत असतानाच आता सीएनजी आणि पीएनजी गॅसच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महागाईचा स्फोट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
घरगुती वापरासाठी असलेल्या गॅसच्या दराची किंमत ऑक्टोबर महिन्यात ठरवण्यात येणार आहे. देशांतर्गत उत्पादन होणाऱ्या गॅसच्या बेस प्राइजमध्ये प्रति युनिट 14 टक्के म्हणजे 3.5 डॉलरने (जवळपास 252 रुपये) वाढ होण्याचा अंदाज आहे. मार्च २०१६मध्ये गॅसच्या किंमतीत सर्वाधिक 3.82 डॉलर इतकी वाढ झाली होती.
नैसर्गिक वायूची किंमत डॉलरमध्ये असते आणि डॉलरच्या तुलनेत रुपया घसरून 72.25 रुपयांवर पोहचला आहे. रुपयाची ही सततची घसरण पाहता खर्चात वाढ होणार असल्याचे बोलले जात आहे. सीएनजी गॅस वितरकांसाठी गॅसची किंमत वाढली आहे. त्यामुळे आता दरवाढीचा फटका आता ग्राहकांनाही बसणार अशी शक्यता निर्माण झाली आहे.





























































