
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलची भाववाढ जवळजवळ रोजच होत आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी राजधानी दिल्लीत मेट्रो रेल्वेने प्रवास केला. त्यावरूनही कर्नाटक काँग्रेसने मोदींना घेरले आहे. मोदी यांचा मेट्रो रेल्वेतून प्रवास इंधन दरवाढीमुळे की निवडणूक स्टंटबाजी, असा सवाल कर्नाटक काँग्रेसने आपल्या ऑफिशियल ट्विटर हॅण्डलवरून मोदींना केला आहे.
एका कन्व्हेंशन सेंटरचे भूमिपूजन मी केले. त्यासाठी दिल्ली मेट्रो ते द्वारका असा परतीचा प्रवास मेट्रो रेल्वेने केला, असे ट्विट मोदी यांनी गुरुवारी केले होते. या ट्विटमध्ये मोदी यांनी मेट्रो रेल्वे प्रवासाची काही छायाचित्रेही पोस्ट केलेली होती. त्यानंतर काँग्रेसने हा सवाल केला आहे.






















































