
>> प्रतीक राजूरकर
22 सप्टेंबर हा दिवस 1996 सालापासून वायन हॅपबर्न यांनी हत्तींच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याच्या हेतूने साजरा करण्यास प्रारंभ केला. पुढे जगभरातील अनेक वन्य जीव संस्थांनी तो साजरा करण्यास सुरुवात करून हत्तींच्या प्रति व्यक्त होणाऱया कृतज्ञतेत हातभार लावला. आज जगभरात हा दिवस मोठय़ा प्रमाणात साजरा होत असतो.
हत्ती हा लहानग्यांना अगदी सहजपणे रेखाटता येण्यासारखा प्राणी. कदाचित त्यामुळेच बालमनात हत्तीसारखा विशाल प्राणी सर्वात अगोदर घर करतो. हिंदुस्थानात घराघरात साक्षात गणरायांचा मुक्काम असल्याने हत्तीचे आणि आपले नाते घट्ट असते. हत्ती जरी वन्य जीव असला तरीसुद्धा कथा, चित्रकला, चित्रपट आदी अनेक माध्यमांतून हा वन्य जीव प्रत्येक वयोगटातील व्यक्तीचे आकर्षण म्हणूनच पूर्वापार बघत आलो आहे. उदाहरण घ्यायचे झाल्यास 1982 साली दिल्लीत झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेचा शुभांकर म्हणून रेखाटलेला ‘अप्पू’ हत्ती आजही अनेकांच्या मनात घर करून आहे. म्हणूनच त्यानंतर अनेक शहरांत अप्पू घरांची निर्मिती झाली, जिथे आजही सर्व वयोगटांतील व्यक्ती आपले बालपण जोपासतात.
हत्तींच्या कळपात हत्ती जन्माला आल्यावरचा उत्साह आणि आनंद हा देखण्याजोगा सोहळा असतो. कळपातील सगळे हत्ती आनंदाने एकत्रित येऊन आपला आनंद द्विगुणित करतात. अगदी मानवाप्रमाणे ‘कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या’ असा नवजातकाच्या स्वागताचा सोहळा वाटावा. हत्ती हा अतिशय कुटुंबवत्सल प्राणी, मानवातील लहान बालकाप्रमाणे त्याला आई, आजी, पणजी यांच्या बाबतीत विलक्षण जिव्हाळा असतो. तो कितीही मोठा झाला तरी त्यांच्यातील सर्वात वयोवृद्ध हत्तिणीच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली हत्तींचा समूह वावरत असतो. त्याला कारण तिचा अनुभव. हत्तींच्या समूहास सर्वात वयोवृद्ध हत्तिणीच्या सहवासात अधिक सुरक्षिततेची भावना असते. म्हणूनच वीरप्पनसारख्या क्रूरकर्म्याला हातात शस्त्र घेऊनही हत्तींच्या नैसर्गिक अधिवासाचा आसरा घ्यावा लागला, पण हत्तींबद्दल कृतज्ञता तर दूरच, पण वीरप्पनची हत्तींच्या प्रति असलेली कृतघ्नताच अखेरपर्यंत दिसली. हत्ती जरी वन्य प्राणी असला तरी वन समाजातील सर्वाधिक सामाजिक प्राणी म्हणून हत्तीची गणना होते. हत्ती जितका सहज जंगलात असतो, तितकाच मोकळेपणानं तो माणसांत मिसळतो.
जंगलातील अतिदुर्गम भागात निर्माण झालेल्या नैसर्गिक आपत्तीत हत्तीशिवाय पर्याय नसतो. जिथे मनुष्याला जाणे अशक्य आहे अशा प्रदेशातून हत्ती मदतीचा मार्ग सुकर करतात. वर्षावनात अनेक क्षेत्रांत जिथे सूर्यप्रकाश पोहोचत नाही, त्या ठिकाणी हत्तींच्या येण्याजाण्याने मार्ग तयार होतात. जंगलातील विघ्नहर्त्याचे कार्य निसर्गाने हत्तीला बहाल केले आहे. म्हणून हत्तींचा नैसर्गिक अधिवास नसलेल्या जंगलातसुद्धा वन विभाग श्रद्धेने हत्तींचे पालनपोषण करतात. हिंस्र श्वापद हत्तीच्या सहवासात वन कर्मचाऱयांवर हल्ला करण्याचे धैर्य दाखवत नाहीत. अर्थात तो वन्य जीवांचा एकमेकांच्या प्रति आदरभाव म्हणणे अधिक समर्पक ठरेल. हत्तींवर बसून व्याघ्रदर्शन करण्याची प्रथा ही अनेक वर्षे लोकप्रिय ठरली. त्यातून हत्तीची स्वारी आणि व्याघ्रदर्शन असा दुग्धशर्करा योग पर्यटकांना अनेक वर्षे लाभला, पण त्यासाठी हत्तींना दिल्या जाणाऱया प्रशिक्षणावर मोठय़ा प्रमाणात टीका झाल्याने ती जवळपास बंद करण्यात आल्याचे समजते. गेल्या काही दशकांत वाढत्या शहरीकरणामुळे, हत्तींचा कमी होत चाललेल्या अधिवासामुळे अनेक क्षेत्रांतून हत्ती विस्थापित झाले आणि नको त्या ठिकाणी प्रस्थापित होण्याच्या प्रयत्नातून मानव-हत्तींच्या संघर्षात दुर्दैवाने प्रचंड वृद्धी झाली. त्यामुळे हत्तींचे, मानवाचे आणि शेतीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. याव्यतिरिक्त महामार्ग आणि रेल्वेमार्गांनी हत्तींच्या मार्गात मोठा अडथळा निर्माण केला. ज्या हत्तींना अडथळ्यातून मार्ग काढण्यास वापरले जाते त्याच हत्तींच्या मार्गात विकासाचे अडथळे येऊन उभे राहिल्याने हत्तींच्या नैसर्गिक आणि मानसिक दिशा बदलल्या गेल्याने अनेक दुःखद प्रसंग उद्भवले आहेत असे गेल्या काही वर्षांतील आकडेवारीवरून स्पष्ट होतं.
शासकीय धोरण, अधिवासाचा अभाव, रेल्वे-महामार्ग, अवैध शिकारी यामुळे प्रचंड बुद्धिमान प्राण्याची आजची अवस्था एका अनैसर्गिक संघर्षाकडे वाटचाल करते आहे. शासन, न्यायालय, वन्य जीव संस्था, समाज माध्यमं, पत्रकार इत्यादींनी अनेक प्रयत्न केले आहेत, पण इतके होऊनही ते प्रयत्न तोकडे पडत आहेत. वन्य जीव संवर्धनात कार्य करणाऱया संस्थांच्या अहवालातून आशियातील हत्तींची संख्या चिंताजनक आहे. हिंदुस्थानात 2017 च्या अहवालाप्रमाणे गेल्या 4-5 वर्षांत 10 टक्के घट झाली आहे की, आशियातील 60 टक्के हत्ती हे हिंदुस्थानात आहेत. म्हणून यासाठी त्वरित उपाययोजना करण्याची गरज आहे. तोवर जंगलात अलौकिक कामगिरीने निसर्गात भरीव योगदान करणारा हत्ती मात्र शहरातील घरात शोभेची वस्तू म्हणून आपल्याला खुणावत राहील. जंगलातील विघ्नहर्त्या हत्तींवर असलेले आणि हत्तींमुळे येणारे विघ्न दूर व्हावे याकरिता योगायोगानं गणेशोत्सवात आलेल्या हत्तींच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करणाऱया दिवसाचे औचित्य साधून विघ्नहर्त्या श्री गणरायांना साकडे घालूया. हीच हत्तींच्या प्रति खरी कृतज्ञता ठरेल.
अभ्यासकांच्या मते पृथ्वीवरील प्राण्यांत सर्वात मोठा मेंदू असलेला प्राणी म्हणजे हत्ती. जन्मतः हत्तीचा मेंदू हा 35 टक्के विकसित असतो. त्याची वाढ लक्षात घेता त्याच्या बुद्धिमत्तेची कल्पना येऊ शकते. अतिशय संवेदनशील मनाचा प्राणी म्हणून हत्तीची ओळख आहे. आपल्या समूहातील दुःखी हत्तीच्या जवळ जाऊन ते स्पर्शाने त्याच्या दुःखात आपला सहभाग नोंदवितात. माणसाप्रमाणे आपल्या सोंडेचा वापर हस्तांदोलन म्हणून हत्ती नेहमीच करतात, तर कधी लहानग्या हत्तीच्या पिलाला सोंडेने धपाटा घालून योग्य मार्गावर चालण्यासाठी वापर करतात. आपल्या मस्तिष्कात अनेक आठवणी साठवण्याचे सामर्थ्य असलेल्या हत्तीला स्वतःला आरशात ओळखण्याचे कौशल्य असल्याचे निष्कर्ष आहेत. हत्तीच्या सोंडेत जवळजवळ एक लाख वेगवेगळ्या प्रकारचे स्नायू असल्याचा अभ्यासकांचा दावा आहे. म्हणूनच जितकी सामर्थ्याची उपयुक्तता असू शकते तितके तीव्र हत्तीचे उपद्रव मूल्य आहे. हत्ती आणि मुंगीच्या कल्पनेतील विरोधाभासातून अनेकांना हसविले, तितकेच वास्तविकतेतील अनेक दुर्दैवी प्रसंगांत हत्तीच्या मृत्यूने तर कधी हत्तीच्या धुमाकुळाने झालेल्या शारीरिक आणि पिकांच्या नुकसानीने अनेकांना रडविले. अनेक देवस्थानांतील हत्तीच्या निधनाने भक्तांचे अश्रू अनावर झाल्याचे वाचनात येत असते.





























































