
सामना ऑनलाईन । उरण
जहाजांची आयात-निर्यात वाढावी यासाठी जेएनपीटीने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. उरणमध्ये सेझसाठी संपादित केलेली 44 एकर जागा जेएनपीटीने दुबईच्या डीपी वर्ल्ड्स इंडिया या कंपनीला 50 वर्षांसाठी भाडे करारावर दिली आहे. या व्यवहारातून जेएनपीटीला तब्बल 566 कोटी रूपये मिळणार आहेत.
जेएनपीटी सेझच्या ताब्यात एकूण 684 एकर जागा आहे. रोजगाराला चालना देणे, कंटेनर हाताळणीची क्षमता वाढवणे, गुंतवणुकीला चालना देणे हाच या सेझमागचा उद्देश होता. आतापर्यंत जेएनपीटीने 75 एकर जागा भाडेतत्त्वावर देवून त्यातून 630 कोटी मिळवले आहेत. आता आणखी 44 एकर जागा दुबईच्या कंपनीला देण्यात आली आहे. जेएनपीटी सेझचे क्षेत्र नवी मुंबई विमानतळापासून अवघ्या 15 किलोमीटर तर बंदरापासून पाच किलोमीटर अंतरावर असल्याने यापुढेही सेझमध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक होईल असा विश्वास जेएनपीटीचे अध्यक्ष नीरज बन्सल यांनी व्यक्त केला.




























































