
सामना ऑनलाईन । जयपूर
राजस्थानात पुढील वर्षाच्या सुरुवातीला विधानसभा निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे बंडखोर नेते जसवंत सिंग यांचे पुत्र मानवेंद्र सिंग यांनी भाजपचा राजीनामा दिला आहे. कमल की फूल हमारी भूल थी… असे उघडपणे सांगून त्यांनी भाजपला धक्का दिला आहे. राजस्थानात बारमेर जिह्यात आज स्वाभिमान रॅली आयोजित केली होती. यावेळी ते म्हणाले, कमल की फूल हमारी भूल थी… गौरव आणि संकल्पचे अनेक मेळावे झाले, पण आजचा मेळावा, रॅली ही सर्वात मोठी असून ही स्वाभिमान रॅली आहे. बारमेर-जैसलमेर लोकसभा मतदारसंघातून 2014 या निवडणुकीत जसवंत सिंग यांना भाजपने तिकीट दिले नाही. तेव्हापासून जसवंत सिंग कुटुंबीयांचे मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्याबरोबरचे संबंध बिघडले आहेत. पक्षाच्या अधिकृत उमेदवाराचा प्रचार करण्याऐवजी मानवेंद्र सिंग यांनी आपले वडील जसवंत सिंग यांचा प्रचार केला. यावरून त्यांचे भाजपचे प्राथमिक सदस्यत्व निलंबित केले आहे.
























































