भयंकर! मोबाईल चोरीच्या संशयामुळे १० वर्षांच्या मुलावर ओतला उकळता पाक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । पाटणा

देशात मॉब लिंचिंगच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. मोबाईल चोरीच्या संशयामुळे एका १० वर्षांच्या मुलावर जमावाने उकळता पाक ओतल्याची घटना बिहार येथे घडली आहे.

बिहार येथील फुलवारी शरीफ येथे ही भयंकर घटना घडली आहे. शनिवारी येथील एका मोहल्ल्यात नूर आलम नावाच्या माणसाचा मोबाईल हरवला. मोबाईलची शोधाशोध सुरू होताना तिथे फिरणाऱ्या एका दहा वर्षांच्या मुलावर मोबाईल चोरीचा आरोप करण्यात आला. या संशयामुळे इथल्या स्थानिकांनी त्याला पकडून मारहाण करायला सुरुवात केली. अंगावर वळ येईपर्यंत मुलाला मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्यांनी या मुलाला विवस्त्र करून एका झाडाला बांधलं. एवढ्यावर जमाव शांत झाला नाही. त्यांनी त्या मुलाच्या अंगावर उकळता पाक ओतला. कारण ज्या झाडाला त्याला बांधण्यात आलं होतं, तिथे मुंग्या होत्या. या मुंग्यांनी त्याच्यावर हल्ला करावा म्हणून जमावाने हे भयंकर कृत्य केलं.

या दरम्यान तो मुलगा दयेची याचना करत होता, पण जमावाला त्याची दया आली नाही. त्याला कुणीही झाडापासून सोडवण्यासाठी पुढे आलं नाही. काही तास तो मुलगा तसाच झाडाला बांधलेल्या अवस्थेत होता. पाकामुळे मुंग्या त्याला चावत होत्या. पण, लोकांना त्याची दया आली नाही. अखेर पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्या मुलाला जमावाच्या तावडीतून मुक्त केलं.

summary- boy beaten up by mob