
सामना प्रतिनिधी । संगमेश्वर
संगमेश्वर देवरुख राज्य मार्गावरील बुरंबी सोनवी पुलाच्या जोडरस्त्याचा भराव खचल्याचा प्रकार गत महिन्यात घडला होता. याची गंभीर दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता जे.डी. कुलकर्णी यांनी बुरंबी येथे भेट देऊन पुलाची पाहणी केली. यावेळी पाण्याचा प्रवाह बदलून सरंक्षक भिंतीचे काम तत्काळ सुरु करा असे निर्देश कुलकर्णी यांनी दिले आहेत.
देवरुख संगमेश्वर राज्य मार्गावर सोनवी या नदीवर 1947 साली हा पूल बांधण्यात आला. पुलाला असलेला जोडरस्ता खचल्याची गंभीर बाब 30 ऑगस्ट रोजी निदर्शनास आली होती. त्यानंतर संगमेश्वरचे तहसीलदार संदीप कदम यांनी सर्व यंत्रणांना सतर्कतेच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार संगमेश्वर पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून बॅरीकेटस लावले आणि या ठिकाणावरुन एकेरी वाहतूक सुरु केली. हा प्रकार लक्षात येताच देवरुख येथील बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी भेट देऊन पाहणी केली होती. या ठिकाणी संरक्षक भिंत उभारणे गरजेचे असल्याचा अहवाल वरिष्ठांना दिला होता.
देवरुख बांधकाम विभागाकडून प्राप्त अहवालाची गंभीर दखल घेऊन अधीक्षक अभियंता जे. डी. कुलकर्णी यांनी बुरंबी सोनवी पूलाची पाहणी करुन येथील अडचणी समजून घेतल्या. तडा गेलेल्या संरक्षक भिंतीच्या बाजूने पाण्याचा मोठा प्रवाह असल्याने सद्यस्थितीत काम सुरु करणे शक्य नसल्याचे देवरुख येथील अभियंत्यांनी सांगितले. मात्र पाण्याचा प्रवाह अन्यत्र वळवून सध्या पाऊस कमी झाला असल्याच्या संधीचा लाभ घेऊन संरक्षक भिंतीचे काम लवकरात लवकर पूर्ण करा अशा सूचना अधीक्षक अभियंत्यांनी दिल्या आहेत. यावेळी कार्यकारी अभियंता एन. आर. सावर्डेकर, देवरुखचे उप अभियंता सागर कांबळे, शाखा अभियंता भारती आणि ठेकेदार संदीप रहाटे यावेळी उपस्थित होते .






















































