
सामना प्रतिनिधी । मुंबई
कमला मिलप्रमाणेच चटई क्षेत्राचे उल्लंघन करून केलेली अनधिकृत बांधकामे आज पालिकेच्या जी दक्षिण कार्यालयाने जमीनदोस्त केली. 20 हजार चौरस फुटांवरील तब्बल 7 अनधिकृत बांधकामे आज न्यायालयाच्या आदेशानंतर तोडण्यात आली.
कमला मिलमधील आगीच्या दुर्घटनेनंतर सेनापती बापट मार्गावरील रघुवंशी मिल मधील अनधिकृत बांधकामांनाही पालिका प्रशासनाने नोटीसा बजावल्या होत्या. महापालिकेच्या ’जी दक्षिण’ विभाग कार्यक्षेत्रात असणार्या या 7.2 एकर आकाराच्या भूखंडावर काही अनधिकृत बांधकामे उद्भवली होती. महापालिकेच्या नियम व पद्धतींनुसार या बांधकामांवर कारवाई करण्याच्या दृष्टीने नोटीसेस बजावण्यात आल्या होत्या. मात्र संबंधित मालकांनी पालिकेच्या या नोटीसीविरोधात नगर दिवाणी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र न्यायालयाने या याचिका आज फेटाळल्या. त्यानंतर महापालिकेच्या ’जी दक्षिण’ विभागाद्वारे आज धडक कारवाई करण्यात येऊन सुमारे 20 हजार चौरस फुटांवरील 7 अनधिकृत बांधकामे तोडण्यात आल्याची माहिती ’जी दक्षिण’ विभागाचे सहाय्यक आयुक्त देवेंद्रकुमार जैन यांनी दिली आहे.
या धडक कारवाई दरम्यान संबंधित 7 अनधिकृत बांधकामे तोडण्यात आली. यामध्ये मे. लिटील नॅप (मे. पर्सेप्ट ऍडव्हर्टायझिंग लि.), दुर्गावती जयस्वार, 99 पॅनकेक, मे. एव्हरलास्ट, मे. नातूझी, नातूझी कार्यालय (मे. रेनेसन्स पेंट्स), बाबुलाल बोहरा कार्यालय यांचा समावेश आहे. ही सर्व अनधिकृत बांधकामे 1 ते 3 मजल्यांची आहेत. ही कारवाई करण्यासाठी महापालिकेच्या ’जी दक्षिण’ विभागाचे 35 कामगार – कर्मचारी – अधिकारी देखील या अतिक्रमण निर्मूलन कारवाईत सहभागी झाले होते. ही बांधकामे तोडण्यासाठी 2 जेसीबी, 2 डंपर, 3 गॅस कटर इत्यादी साधनसामुग्री वापरण्यात आली.
बृहन्मुंबई महापालिकेच्या ’जी दक्षिण’ विभागाच्या कार्यक्षेत्रातील रघुवंशी मिल परिसरातील 7 अनधिकृत बांधकामांना नोटीसेस जारी करण्यात आल्यानंतर संबंधितांनी मा. नगर दिवाणी न्यायालयात विनंती अर्ज दाखल केला होता. हा विनंती अर्ज 24 जुलै 2018 रोजी खारिज करण्यात आला. त्यानंतर संबंधित मालकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र उच्च न्यायालयाने देखील संबंधितांचा विनंती अर्ज खारिज केला आहे. त्यामुळे आजच पालिकेने या सर्व बांधकामांविरोधात कारवाई केली.



























































