व्हॉट्सअॅपच्या अफवांना रोखणार, कोमल लाहिरी नव्या तक्रार अधिकारी 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी  । नवी दिल्ली

हिंदुस्थानात मॉब लिंचिंगच्या वाढत्या घटनांमध्ये व्हॉट्स ऍपचे नाव आल्यामुळे व्हॉट्सअॅप कंपनीच्या चिंता वाढल्या आहेत. अशातच कंपनीने आपल्या ऍपमधून पसरणार्‍या अफवा थांबवण्याची जबाबदारी एका महिला अधिकार्‍याला दिली आहे. कोमल लाहिरी असे त्यांचे नाव असून त्या व्हॉट्स ऍपच्या ग्लोबल कस्टमर ऑपरेशनच्या वरिष्ठ संचालिका आहेत. कोमल लाहिरी या अमेरिकेत राहूनच हिंदुस्थानात व्हॉट्स ऍपच्या माध्यमातून पसरणार्‍या मेसेजवर लक्ष ठेवतील.

व्हॉट्सअॅपने आपल्या वेबसाईटवर तक्रारी अधिकारी नियुक्त केल्याची माहिती दिली आहे. यामध्ये युजर मॅसेज किंवा ईमेल पाठवून कोमल लाहिरी यांच्याशी संपर्क साधू शकतात, युजर्सची पूर्ण मदत केली जाईल, असे लिहिले आहे. लाहिरी यांची नियुक्त ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस करण्यात आली आहे. त्या व्हॉट्सअॅपच्या आधी फेसबुकसोबत काम करीत होत्या. फेसबुकमध्ये लाहिरी दोन वर्ष 9 महिने सीनियर डायरेक्टर या पदावर होत्या. त्यांनी पुणे विद्यापीठातून बीकॉम आणि सेंट क्लेरा युनिव्हर्सिटीतून एमबीए पूर्ण केले आहे.

कशी कराल तक्रार 

व्हॉट्सअॅप वेबसाईटच्या माहितीनुसार, ऍपच्या सेटिंग ऑप्शनमध्ये हेल्प फिचर आहे. त्यामध्ये ‘कॉन्टॅक्ट अस’ हा पर्याय देण्यात आला आहे. त्याचा वापर करून युजर्स थेट कंपनीच्या सपोर्ट टीमशी संपर्क करू शकतात. जर युजर्सना आपली तक्रार आणखी पुढे न्यायची असेल तर ते थेट तक्रार अधिकार्‍यांशी संपर्क साधू शकतात.