अध्यात्मरंग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रंगभूमीची व्याप्ती आणि दृष्टिकोन नेहमीच विशाल राहिला आहे. कालपासून सुरू झालेल्या ‘अध्यात्मरंग’ महोत्सवाविषयी…

अध्यात्माचा प्रचार-प्रसार होण्यासाठी दादर-माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे ‘अध्यात्मरंग महोत्सव’ साजरा होत आहे. आज ‘अथर्वशीर्ष’ या विषयावर व्याख्याते धनंजय गोखले यांचे तर उद्या कीर्तन आख्यानाशी संबंधित ‘विष्णू आणि विष्णूची आयुधे’ या विषयावर कीर्तनकार वंदना टिळक यांचे आख्यान आयोजित करण्यात आले आहे. दोन्ही कार्यक्रम सायंकाळी 6 वाजता सादर होणार आहेत.

नेतृत्व आणि व्यवस्थापन यादृष्टीने ‘मला उमजलेले गणपती अथर्वशीर्ष’ या विषयावर धनंजय गोखले संवाद साधणार आहेत. या व्याख्यानातून श्रोत्यांना व्यवस्थापन शिकण्याची संधी मिळेल. तसेच यासोबत अर्थकारण, राजकारण याचे दैनंदिन जीवनातील महत्त्व, दैनंदिन कामाचे व्यस्थापन कसे करावे, दिशांचे महत्त्व इत्यादी व्यवस्थापनाचे वेगवेगळे पैलू उलगडून सांगितले जाणार आहेत. याशिवाय त्यांना अथर्वशीर्ष सांगताना आलेले अनोखे अनुभव… अथर्वशीर्षातील प्रत्येक ऋचेचा अर्थ त्यामागे व्यवस्थापन आणि नेतृत्वाच्या दृष्टीने असलेली त्यांची धारणा प्रेक्षकांना या व्याख्यानाद्वारे प्रत्यक्ष अनुभवता येणार आहे.

‘विष्णू आणि विष्णूची आयुधे’ या विषयावर शुक्रवार, 28 सप्टेंबर रोजी कीर्तनकार वंदना टिळक यांचे कीर्तन आख्यान होणार आहे. भगवान विष्णूला विश्वाचा पालक म्हटले आहे. शांती, सुख आणि समृद्धी मिळवण्यासाठी विष्णूची पूजा केली जाते.  हिंदू धर्मात भगवान विष्णूला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शांती, समृद्धी, सुख मिळवण्यासाठी विष्णूची पूजा केली जाते. विष्णू हे ब्रह्मा-विष्णू-महेश या त्रिदेवांपैकी एक आहेत. ब्रह्माने ब्रह्मांडाची निर्मिती केल्यानंतर भगवान विष्णू ब्रह्मांडाचे रक्षण करतात. चार हात असणाऱ्या विष्णूच्या हातांमध्ये शंख, सुदर्शनचक्र, कमळ आणि गदा असते. महत्त्वाचे म्हणजे, असुरांचा नाश करण्यासाठी विष्णूने मत्स्य, कुर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण हे अवतार घेतले. या अवतारांचे महत्त्व तसेच विष्णूच्या हातातील प्रत्येक आयुधांचे महत्त्व कीर्तनकार वंदना टिळक सांगणार आहेत.

विनामूल्य कार्यक्रम…

अध्यात्मातील वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करणारे व्याख्याते, कीर्तनकार आपल्याकडे आहेत. वक्त्यांसह प्रत्येक विषयाला व्यासपीठ मिळावे. श्रोत्यांच्या माहितीत भर पडावी याकरिता दादर-माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे हा ‘अध्यात्मरंग महोत्सव’ साजरा करण्यात येतो. याचे वैशिष्टय़ म्हणजे, अभ्यासपूर्ण असलेले महोत्सवातील सर्व व्याख्याने, कीर्तन आख्यान विनामूल्य ठेवण्यात आली आहेत. श्रोत्यांनी याचा अवश्य लाभ घ्यावा, असे मत केंद्राच्या सेक्रेटरी किरण चित्रे व्यक्त करतात.